कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयचे विद्यार्थी घेताहेत कुक्कुटपालन संगोपनाचे धडे

फोंडाघाट, दि.३ मार्च (संजय सावंत)
कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवात्मक शैक्षणिक कार्यक्रम या उपक्रमांतर्गत कुक्कुट पालन या विषयाचे शिक्षण घेत आहेत.
कृषी पदवीधरांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी शासकीय व इतर नोकरीवर अवलंबून न राहता स्वतः उद्योजक बनावे आणि इतरांना ही रोजगाराचा आणि उत्पन्नाचा पर्याय तयार करावा ज्यामुळे तो विद्यार्थी भविष्यात बेरोजगार राहणार नाहीत तसेच स्वयंरोजगारातून विद्यार्थी आर्थिक दृष्टीकोनातून आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात विद्यार्थी कुक्कुटपालन या व्यवसायाशी निगडित पक्षांचे निवारा शेड कसे उभारावे, पक्षी आणण्याच्या अगोदर निवारा शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण कसे करावे, निरनिराळया हंगामात पक्षांचे संगोपन , ब्रुडिंग ,देखभाल कशी करावी, पक्षांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन तसेच वेगवेगळ्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण कधी व कसे करावे, पक्षांच्या चोची कापणे आणि पूर्ण वाढ झाल्यावर पक्षांची स्थानिक बाजारपेठेत विक्री व विपणन कसे करावे, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे या गोष्टी विद्यार्थी उपक्रमात शिकत आहेत.
सदर उपक्रमात गौरव लोखंडे , राजेश माने, आदित्य माळी, अनिकेत माळी, करण पाटील, निलेश पावरा,गौरव पवार, गितेश पुजारी, विश्वतेज पाटील, अथर्व पिसे, वैष्णवी पाटील, स्नेहल पाटील, सायली पवार, श्रेया पाटील, कुलदीप पवार,हर्ष पवार हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना विषय शिक्षक सुशीलकुमार मोटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.सदर उपक्रम राबवण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दर्शना कदम, ब्राम्हणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट या संस्थेचे अध्यक्ष दिपेश मराठे, मिताली मराठे आणि सचिव विद्या राणे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.