केंद्रीय मंत्री नारायण राणेंची कणकवली येथील निवासस्थानी किरण सामंत यांनी घेतली भेट

कणकवली दि.३ मार्च(भगवान लोके)

केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेचे सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांनी शनिवारी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असून जिल्ह्यात त्याबाबत चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीला तळकोकणात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये नेमका कोणाच्या वाट्याला येणार ? हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, शिवसेनेकडून मागील वर्षभर लोकसभेसाठी किरण सामंत यांच्या उमेदवारीची प्रबळ दावेदारी केली जात आहे. खुद्द किरण सामंत यांनीही लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेला असेल असे जाहीर केले आहे. सोबतच
किरण सामंत यांनी लोकसभा लढवावी असेही म्हटले होते. तर अलीकडेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत हा मतदारसंघ भाजपाच लढवेल असे जाहीर केले. खुद्द नारायण राणे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील असेही चर्चिले जात आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जाऊन किरण सामंत यांनी त्यांची भेट घेणे, त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या पाया पडणे,याची जोरदार चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे.
फोटो ओळ- कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शनिवारी किरण सामंत यांनी भेट घेतली.