युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालले तर देशाला अशक्य असे काहीच नाही-संस्थापक संदीप परब

0

तळेरे,दि.१३ जानेवारी

आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालले तर देशाला अशक्य असे काहीच नाही. मुलांनो तुम्ही देशाची ताकद आहात, ही ताकद वाया जाऊ देऊ नका आणि आई वडिलांना कधीही विसरू नका, असे प्रतिपादन संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांनी केले. ते भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग नगरी यांच्यातीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

नेहरू युवा केंद्र पुरस्कृत या स्पर्धेचे आयोजन अक्षरोत्सव परीवार आणि प्रज्ञांगन परीवार यांच्यावतीने तळेरे येथे करण्यात आले होते. यामध्ये प्रणिता भक्तराज राऊळ – कोटकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक संदीप परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक प्रमोद कोयंडे, अशोक मुद्राळे, अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वरुणकर, श्रावणी कंप्युटर चे संचालक सतीश मदभावे, प्रज्ञांगनच्या श्रावणी मदभावे आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा 15 ते 29 वर्षे वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रणिता भक्तराज राऊळ – कोटकर (प्रथम), स्नेहा संजय पवार (द्वितीय), केशव रामकृष्ण नाचीवनेकर (तृतीय) तर उत्तेजनार्थ माही सुधीर साटम, सानिका रामदास काळसेकर, ईशा जयवंत सावंत, सिध्दार्थ यशवंत जठार यांना देण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ हिंदुस्थान पेट्रोलियम चे वरिष्ठ व्यवस्थापक विजय केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सौ. केसरकर, प्रा. हेमंत महाडिक, प्रा. नरेश शेट्ये, स्पर्धेचे परीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर परीक्षक आणि प्रमुख पाहुणे यांना सन्मानचिन्ह आणि गुलाब रोपटे देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, इथे आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यात कशी वाटचाल केली पाहिजे, देश पुढे कसा विकसित झाला पाहिजे. याबाबत वैचारिक मंथन झाले. आमचेही उद्दिष्ट स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचे असून अनेकांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने ते पूर्णत्वास जाईल, अशी माहिती दिली. यावेळी परीक्षक प्रमोद कोयंडे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तर स्पर्धांकामधून प्रणिता भक्तराज राऊळ – कोटकर, मंगल अरुण परब, केशव रामकृष्ण नाचिवणेकर, माधवी विजय पांचाळ यांनी स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर, प्रास्तावीक सतीश मदभावे यांनी केले.