सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.!
सावंतवाडी दि.४ मार्च
अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत दोडामार्ग संघाच्या महेश लोंढेने आपल्या संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेंगुर्ला पत्रकार संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
रविवारी सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या. यात दोडामार्ग संघाने अंतिम सामन्यात वेंगुर्ला पत्रकार संघाच्या पराभव करीत विजेतेपद मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा – २०२४ सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी व्यासपीठावर सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, युवा उद्योजक विराग मडकईकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, सिताराम गावडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या दोडामार्ग संघाला रोख रक्कम ११ हजार १०० रुपये व चषक प्रदान करण्यात आला तर उपविजेत्या वेंगुर्ला संघास रोख रक्कम ७ हजार १०० व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांनी तर द्वितीय पारितोषिक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने प्रायोजित केले. तसेच विजेत्या व उपविजेता या संघाला देण्यात आलेले चषक सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमी यांच्या वतीने संचालक महेंद्र पेडणेकर यांनी प्रायोजित केले व तर ग्लोबल महाराष्ट्र तर्फे लहान चषक पुरस्कुत करण्यात आले.
ह्या पत्रकारांनी गाजवली स्पर्धा
सावंतवाडी येथे संपन्न झालेली जिल्ह्यातील पत्रकारांसाठीची क्रिकेट स्पर्धा अनेक खेळाडूंनी गाजवली यात सर्वोत्तम खेळाडू अर्थात मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला तो कुडाळ संघातून खेळलेला समीर चव्हाण तर अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार दोडामार्ग संघाचा विस्फोटक फलंदाज संतोष लोंढे यांनी पटकावला.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज वेंगुर्ला अवधूत पोईपकर, सर्वोत्तम फलंदाज वेंगुर्ला संघाचा विस्फोटक फलंदाज व कर्णधार हर्षल परब तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार सोशल मीडिया संघाचा खेळाडू मिळविला. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावंतवाडी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर,सचिन रेडकर,राजेश मोंडकर, दीपक गांवकर, विजय राऊत, जिल्हा खजिनदार संतोष सावंत,राजू तावडे,हर्षवर्धन धारणकर, लुमा जाधव, हेमंत मराठे, काका भिसे, संजय पिळणकर अनुजा कुडतरकर, जतिन भिसे, अनिल भिसे, संतोष परब, विजय देसाई, शैलेश मयेकर,जय भोसले, नरेंद्र देशपांडे , निखिल माळकर, भुवन नाईक, संतोष मुळीक, संजय पिळणकर,नितेश देसाई ,नयनेश गावडे, अभय पंडित,व पत्रकार संघाच्या व शोशल मीडियाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण मांजरेकर यांनी केले. स्पर्धेचे खुमासदार समालोचन जय भोसले,समीर चव्हाण यांनी केले.पंच म्हणून रुपक मातोंडकर व राऊत यांनी काम पाहिलं.तर गुणलेखन विनायक राऊत यांनी केलं.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची अंतिम सामन्यास उपस्थिती
सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे नाणेफेक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री केसरकर यांचे स्वागत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. दरम्यान मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून पत्रकारांच्या विविध उपक्रमांना आपण नेहमीच सहकार्य करू, असे आश्वासन दिले. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी श्री. निकम हे देखील उपस्थित होते.