कुणकेश्वर यात्रा उत्सवासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज !

कुणकेश्वराच्या भेटीसाठी सहा देवस्वारांचे होणार आगमन…अध्यक्ष संतोष लब्दे

देवगड,दि.४ मार्च
दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सव ८ मार्च ते १० मार्च २०२४ या कालावधीत संपन्न होणार असून येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज देव दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून भव्य मंडप दर्शन रांगा, तसेच श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी ६ देवस्वाऱ्या येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी दिली.
कुणकेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी सचिव शरद वाळके,खजिनदार अभय पेडणेकर,उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,सदस्य संजय आचरेकर, अजय नाणेरकर,विजय वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम माजी सरपंच चंद्रकांत घाडी आदि ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष -श्री लब्दे,म्हणाले की,श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि. ०८ मार्च २०२४ ते १० मार्च २०२४ रोजी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे रविवार अमावास्या पवित्र स्नानाचा लाभ देवस्वाऱ्या सोबत मिळणार
आहे. दिनांक १० मार्च २०२४
तिर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार असून.सदर
यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये
भव्य मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालिन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी
पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व
मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्य प्रकारे नियोजन
करण्यात आले आहे.
यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशा
प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परीसर, यात्रा
परिसरात आवश्यक त्याठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावर्षी
त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक
आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे.
त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबधित खात्याने आवश्यक ते
कामकाज यात्रेपुर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही चालु आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दिच्या प्रमाणात दिवसेंदिवस
लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी अमावस्या दिनांक १० मार्च रोजी असल्याने
तिर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपुर्ण दिवस लाभ घेता
येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरूष व
महिलांकरीता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची विशेष व्यवस्था असणार असून. तसेच
पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके
असणार आहेत.
यात्रा परीसरामध्ये राजकिय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण
होवू नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून
करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनर्सच्या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली
आहे.
उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुणकेश्वर येथे ग्रामस्थ कुणकेश्वर
व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेसमवेत यात्रा नियोजन बैठक पार पडली.
त्यात प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करुन, उणीवा समजुन घेण्यात आल्या त्याच प्रमाणे
संबधित शासकीय खात्याना अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात
आल्या त्यात प्रामुख्याने . वहातुक व्यवस्था, रस्ते, विद्युत व्यवस्था आरोग्य
व्यवस्था ,पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, पार्कंग व्यवस्था . स्वयंसेवक
पाणीपुरवठा यासर्व मुद्यांवर आढावा घेण्यात आला.
कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मिठमुंबरी तारामुंबरी मार्गे देवगड जाणारा जिल्हा प्रमुख
मार्ग अजुनही खड्डेमय व असुरक्षित असल्यामुळे सर्व स्तरावरुन शासनाबाबत नाराजी
व्यक्त करण्यात येत आहे. मिठमुंबरी समुद्र किनारी अस्मी हॉटेल येथे बॅरीकेट्स नाहीत
त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपुर्ण
महाराष्ट्र व देशभरात होणार आहे. तसेच संपुर्ण यात्रा परीसरामध्ये एल्. ई. डी. स्क्रीन व्दारे
प्रक्षेपण आहे.
दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पहाता देवस्थान ट्रस्टने नियोजनात
बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर यावर्षी
उद्योजक . किरण सामंत यांनी प्रथम पुजेसाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन
दिल्यामुळे देवस्थान ट्रस्टचे नियोजन चालु आहे. यादरम्यान भाविक भक्तांना दर्शनासाठी
व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन केले जात आहे.
यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी श्री देवी भगवती
देवस्थान – मुणगे देवगड, श्री देव बोंबाडेश्वर – पावणाई देवस्थान मठबुद्रुक – मालवण, श्री
देव भैरवनाथ देवस्थान वरवडे – कणकवली, श्री माधवगिरी देवस्थान माईण कणकवली,
श्री देव गांगेश्वर देवस्थान नारिंग्रे श्री देव बाणकालिंग पावणाई देवस्थान हुंबरठ
कणकवली या देवस्वाऱ्या येणार आहेत.
यावर्षी येणाऱ्या देवस्वाऱ्या दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० ते
रात्रौ ११:०० या कालावधीत श्री देव कुणकेश्वर भेटीकरीता येणार असल्याने सदरहू
कालावधीत काहीवेळ दर्शन रांगा बंद राहतील तसेच प्रथम पुजेदरम्यान महाआरती नंतर
पहाटे ०३:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद
घ्यावी. यावर्षी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी बॅरिकेटींग व्यवस्था करण्यात आली
असुन अपंग व वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग असणार आहे.
भाविक भक्तांनी तसेच व्यापारी वर्गाने आणि सर्व यात्रेकरूंनी यात्रा कालावधीमध्ये
यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट
ग्रामपंचायत कुणकेश्वर व
प्रशासकीय यंत्रणा यांना सहकार्य करुन प्रतीवर्षाप्रमाणे यात्रौत्सव सुरळीत पार पाडावा
असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी केले आहे.