लोकसभा निवडणुक नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक

विनायक राऊत यांच्या कार्य अहवालाचे होणार प्रकाशन ; शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती..

कणकवली दि.४ मार्च(भगवान लोके)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खा.विनायक राऊत पुन्हा एकदा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.त्यासाठी ५ मार्च सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नियोजन बैठक होत आहे.विनायक राऊत यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे,अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली येथील विजय भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत,विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे , महिला आघाडी अध्यक्षा निलम सावंत-पालव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले,गेल्या १० वर्षात विकासाबरोबरच चांगल्या जनसंपर्काचे काम खा.विनायक राऊत यांनी केले त्याबाबत लेखाजोखा असलेल्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणार आहे.या लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै यांच्यासारख्या नेत्यांची असलेली परंपरा जोपासण्याचे काम खा.विनायक राऊत करीत आहेत.त्यामुळे विजयाची हॅट्रिक करीत असताना अडीज लाख मतांनी ते विजयी होतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार,काँगेस नेते राहुल गांधी या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.या मतदारसंघातील राजकीय अपप्रवृत्ती संपविण्याचे काम या मतदारसंघातील जनता करणार आहे.दहशतवाद आणि अहंकार ज्यांना झाला त्या राणेंना जनतेने पराभूत केले आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते,महिला,युवा मोर्चा आणि महविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

सतीश सावंत म्हणाले,खा.विनायक राऊत यांनी जी विकासकामे केली आहेत.त्यांच्या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. या मतदारसंघात मधू दंडवते,नाथ पै या महान नेत्यांची परंपरा खा.राऊत यांनी जोपासली आहे.सर्वसामन्याचे खासदार म्हणून त्यांची लोकप्रियता आहे.आठही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.उद्या खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात होईल.

अतुल रावराणे म्हणाले,हा बुद्धीवंतांचा जिल्हा आहे.तळागाळातील लोकांमध्ये जावून जनतेचे प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवले.त्याउलट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देता येत नाहीत.कोकणातील हुशारी, अभ्यासूपणाला कलंक लावण्याचा प्रकार झाला आहे.ना.राणे यांनी एकही उद्योग जिल्ह्यात आणलेला नाही.आ.वैभव नाईक आणि खा.राऊत यांनी राणेंची दहशत सपविण्याचे काम केले.चिपळुणातील सभेत राणेंच्या परिवारातील सदस्य काय बोलत होते ? हे जनतेला दिसून आले आहे.