डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर वंचित पक्षाला मागत असलेल्या १२ जागा द्या;भाजप नाही तर आदित्य ठाकरे तडीपार होणार
कणकवली दि.४ मार्च(भगवान लोके)
उबाठा आणि शरद पवार गट महाविकास आघाडीत लढणार नाहीत. काँग्रेसला एकट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया आघाडीत काय काय चालले आहे त्याचे लवकरच चित्र पाहायला मिळेल, हे लोक प्रकाश आंबेडकर यांना धोका देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांबद्दल या लोकांना काडीचेही प्रेम नाही.फक्त कॅमेरा समोर इलुईलू करू चॉकलेट दाखवण्याचे काम करतात. आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ते मागत असलेल्या १२ जागा द्या,असा टोला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे
कणकवलीत ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशाच्या पंतप्रधानांवर बोललं की दिवसभर चर्चेत राहायला मिळत ही संजय राऊत यांची सवय झाली आहे. सकाळच्या पत्रकार परिषद मुळे ह्यांचे मित्रपक्षांचे नेते सोडून जात आहेत.ज्या व्यक्तीला स्वतःच घर सांभाळता आलं नाही. पक्ष गेला त्या अतिरेकीं सोबत संबंध असलेल्या संजय राऊत ने मोदींजींना सल्ले देवू नयेत.उद्धव ठाकरेंनी दिलेले किती शब्द पूर्ण केलेत ? ते आधी सांगा.कोकणातील शेतकऱ्यांना किती सबसीडी,नुकसान भरपाई मिळाली ते सांगा.बांधावर जावून शेतकऱ्यांना काय काय सांगितले होते ते आठवा,असा सवाल आ.नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत येथील फार्महाऊस सुशांत सिंग राजपूत बाबत प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला रस्त्यात अटक केली गेली .आंदोलनजीवींचा दुसरा भाऊ म्हणजे संजय राऊत आहे. त्यांना त्याच्यातील कमिशन येत असावे म्हणून त्याची तशी भाषा आहे.संजय राऊतने तयारी दाखवावी मोदींनी सुरू केलेले देशातील ५० प्रकल्प मी फिरवून दाखवतो.त्यासाठी लागणारा सगळा खर्च माझा असेल. माझं आव्हान स्वीकारायला तयार आहात का?आणि हे प्रकल्प दाखविले की मोदी है तो मुमकिन है..हे मान्य करा.संजय राऊत यांनी देशाच्या न्याय व्यवस्थेवर टिपणी करू नये.राऊत यांची भूमिका ही अर्बन नक्षलची भूमिका आहे,अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
दुसऱ्यांच्या घरातल्या बारशाला जाऊन वडापाव खाण ही राऊत यांची सवय आहे. नितीन गडकरी यांचे सोडा तुम्ही तुमच्या जुन्या सैनिकांना किती न्याय दिला? श्रीधर पाटणकर यांच्या कडे १० हजार कोटी कसे आले.उद्धव ठाकरे दिशा सालीयन व सुशांतसिंग च्या आईवडिलांना भेटणार आहेत का ? असा सवाल एका प्रश्नांवर बोलताना केला.
जरांगे पाटील यांच्या वर बोलताना ते म्हणाले,त्यांना मराठा समाज गांभीर्याने घेत नाही. जरांगे समाजाबद्धल कमी आणि राजकारण जास्त बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही.मराठा समाजाला न्याय फडणवीस यांनीच दिला आहे.विनायक राऊत यांना पडण्याची एवढी घाई लागली असेल. देवी कडे साकडे घातले असेल तर त्यांनी बॅग भरून ठेवावी.गुलाबराव पाटील बरोबर बोलले भाजपा तडीपार होणार नाही. तर आदित्य ठाकरे तडीपार होणार आहे. त्यामुळेच आईला घेऊन इकडे तिकडे पाय धरत फिरत असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला.