आंबोली हिरण्यकेशी येथील शासकीय वन अनिर्णित जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मागील १८ दिवसांपासून सुरू
सावंतवाडी,दि.४ मार्च
आंबोली हिरण्यकेशी येथील शासकीय वन अनिर्णित जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मागील १८ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी आमदार तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर काल रविवारी रात्री आठ वाजता पोहोचेल तेव्हा उपोषणकर्त्यांनी जाब विचारला तर महिलांनी घेराव घालत धारेवर धरले. तसेच अतिक्रमणं करणारा न्यायालयात गेला तर केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आंबोली हिरण्यकेशी येथे शासकीय वन अनिर्णित जमीनीवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मागील १९ दिवसांपासून सुमारे दोनशे जणांना साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. याठिकाणी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण पोहोचले नाहीत म्हणून नाराजी व्यक्त केली.
केसरकर उपोषण स्थळी अठराव्या दिवशी पोहोचले म्हणून महिलांसह नागरिकांनी जाब विचारत खरपूस समाचार घेतला. केसरकर आंबोली हे माझे दुसरे घर,माहेर घर असल्याचे सांगायचे तेच उपोषणाला बसलेल्या महिलांनी विचारले. तुम्ही माहेर घर असल्याचे सांगायचे पण उपोषणाला बसलेल्याची विचारपूस करायला १८ दिवस लावले म्हणून नाराजी व्यक्त केली.
केसरकर म्हणाले, कबुलायतदार गावकर जमीन वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मात्र वन अनिर्णित जमीन वाटप करण्याचा निर्णय झाला नाही. त्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र यावेळी उपोषणकर्त्यांनी तोडगा नको तर आंबोली बाहेरच्या लोकांनी उभारलेल्या इमारती प्रथम हटवा अशी मागणी केली.
केसरकर म्हणाले,जर वन अनिर्णित जमीनीवरील अतिक्रमणे झाली असतील.तर त्यावर वनखाते कारवाई करेल. मात्र गावातील नागरिकांनी बांधलेल्या घराबद्दल तोडगा निघाला पाहिजे.
आंबोली येथील शासकीय वन- अनिर्णित जमिनीवर अतिक्रमणे झाले आहे ती ४८ तासात पाडावी म्हणून उपवनसंरक्षक आणि तहसीलदार यांनी संबंधितांना नोटीस दिली आहे त्यामुळे नोटीसीची मुदत संपताच बांधकामावर हातोडा मारावा अशी मागणी केसरकर यांच्यासमोर आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान केसरकर यांनी या प्रकरणी संबंधित न्यायालयात गेल्यास स्थगिती दिली जाऊ नये म्हणून कॅव्हेट दाखल करण्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निर्देश दिले आहेत.