महायुतीचा जो उमेदवार असेल तोच उद्याचा खासदार असेल ; भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी ६ मार्चला
कणकवली दि. ४ मार्च ( भगवान लोके )
कोकणात कुठलाही प्रकल्प आला तरी त्याला विरोध करण्याचं पाप खा. विनायक राऊत यांनी केले . सी वर्ल्ड प्रकल्प , रिफायनरी प्रकल्प या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला. विनायक राऊत हे कोकणच्या विकासाच्या गाड्यांमधील अडकलेला कार्बन आहे. रिफायनरीला मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी केंद्राला पत्र दिले, मुलगा पर्यावरण मंत्री असताना त्यांनी होकार दिला. आमच्या लोकांना रोजगार मिळत असेल तर राऊताना का विरोध हवा आहे. बारसू ची जागा ही उध्दव ठाकरेंनीच सुचवली आहे. त्यामुळे खा. विनायक राऊत हे कोकणच्या विकासाच्या विरोधातील नायक नव्हे तर खलनायक असल्याची घाणाघाती टिका भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी केली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , सरचिटणीस बबलू सावंत , नरेंद्र भाबल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार देशाला प्रगती कडे नेत असताना इथल्या खासदाराची मिसिंग लिंक आहे. आता येणा-या लोकसभा निवडणुकीत महायुती चा खासदार निवडून येणार आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल तोच डबल इंजिनच्या सरकार मधील खासदार असेल . त्याच्यासाठी जनतेतून जाहीरनामा तयार करणार आहोत. विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करीत आहोत. विकासाच्या ब्ल्यू प्रिंट लवकरच जनतेसमोर आणली जाईल.आपल्या मनातील ज्या काही मोठ्या गोष्टी असतील . त्या जनतेने आमच्यापर्यंत पोहचवाव्यात. पुढील काळात महामार्ग हायवे पूर्ण ,कोल्हापूर महामार्ग , सागरी महामार्ग ,ग्रामीण रस्ते ,जलजीवन मिशन योजना सगळ्या कार्यक्षमतेने पूर्ण होतील. घराघरात पाणी पोहचविण्याचे काम केलं जाणार आहे. रेल्वे स्टेशन सुंदर केली जाणार आहेत. कोकणात पर्यटनाचा मोठा प्रकल्प , रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण केला जाईल . हे काम महायुतीचा येणारा खासदार करेल . गेल्या १० वर्षातील विकासाचा बॅकलॉक भरून काढला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा दुवा म्हणून महायुतीचा खासदार काम करेल असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला .
देशातील भाजपाच्या लोकसभा १९५ उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा सन्मान कुंकवण गावचे सुपुत्र विनोद तावडे यांना मिळाला. केंद्रीय नेतृत्वाने फार मोठा मान विनोद तावडे यांना दिला आहे. ६ मार्च रोजी दुसरी यादी येत आहे,त्यानंतर तिसरी यादी असेल. जो कोणी महायुतीचा उमदेवार दिला जाईल, मोदी सरकार आणि राज्यातील नेते यांच्या नेतृत्वाखाली जो उमेदवार येईल तो ३ लाख मताधिक्याने निवडून आणले जाईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण , किरण सामंत यांच्यापैकी कोणीही उमेदवार असतील त्याना आम्ही एक मताने एक दिलाने निवडुन आणणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.
विनायक राऊत यांच्या अपयशामुळे दोन पिढ्यांचे नुकसान झालं आहे.हे नुकसान थांबवायचं असेल तर या निवडणूकीत जनतेने डबल महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या . आ. वैभव नाईक यांचा प्रादेशिक पक्ष आहे,भाजपा हा देशातील मोठा पक्ष आहे. या लोकसभेचे तीन क्लस्टर बनविण्यात आले आहे.त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. भाजपची ही मोठी यंत्रणा आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मावळ,रायगड,रत्नागिरी असे तीन लोकसभा मतदार संघ देण्यात आले आहेत . अडीज दिवस सुध्दा मुख्यमंत्री असताना न जाणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगू नये. त्यामुळेच तुमचे ४० आमदार पळून गेले. शिवसेनेला २३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे वैभव नाईक यांची आम्हाला शाळा घ्यावी लागेल. असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला .