कणकवली दि.४ मार्च(भगवान लोके)
नागवे गावकरवाडी येथे शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भटवाडी येथील रहिवाशी गणेश सुतार हे आपल्या चारचाकी गाडीने रात्री घरी येत होते. गावकरवाडी येथील रस्त्यावर त्यांच्या गाडीसमोर शुक्रवारी पहाटे ३ वा. अचानक बिबट्या आला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सदर बिबट्या जखमी असल्याचे समजते. त्याच्या डोळ्याला व पायाला दुखापत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील परिसरात त्याचा वावर आहे.
तसेच गेल्या दोन वर्षांपासून नागवे परिसरात गवारेड्यांचाही मुक्त संचार आहे. नागवे रस्त्यावर वाहनाने ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. तसेच या रस्त्यावर सकाळी फेरफटका मारण्यासाठी कणकवली येथील नागरिक येत असतात. मात्र कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.