स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची गोवा बनावट दारु विरोधात धडक कारवाई..

आयशर टेम्पोसह गोवा बनावटीची दारु मिळून ५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कणकवली दि.४ मार्च(भगवान लोके)

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही निर्भय व न्याय वातावरणात पार पाडावी. यासाठी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी इंत्यभूत माहिती संकलित करुन त्यांचेविरुध्द परिणामकारक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या आदेशानुसार अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस खर्येवाडी येथे सापळा रचून धडक कारवाई केली आहे.आयशर टेम्पोसह गोवा बनावटीची दारु मिळून ५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते.या पथकास ३ मार्च रोजी आयशर टेम्पो (MH-07-AJ-6059) मधून गोवा बनावटीचे दारुची गोवा-मुंबई हायवेने वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या नेतृत्वाखाली गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचला होता. सकाळी १०.३५ वाजता आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. सदरचा टेम्पो थांबवून चालक व टेम्पोचे
हौद्यामधील मालाची खात्री केली,असता टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारुने भरलेले 828 पुठ्याचे बॉक्स,त्यामध्ये 38 लाख 43 हजार 600 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व 15 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण 53 लाख 43 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर टेम्पोवरील चालक हा आपले ताब्यातील आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 मधून बिगर परवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके,पोलीस अंमलदार लक्ष्मण साळुंके, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, बस्त्याव डिसोजा, अमित तेली, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर यांच्या पथकाने केली.