वागदे डंगळवाडी येथील अपघातातील पसार कारचालक पोलिसांच्या ताब्यात

0

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने वागदे डंगळवाडी येथील सत्यवान महादेव तोरस्कर ( वय ६१ ) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कारचालक मुकेश मारुती मोडक रा.बोर्डवे मधलीवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा अपघात शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास वागदे डंगळवाडी दरम्यान महामार्गावर घडला. वागदे डंगळवाडी या ठिकाणी तोरसकर यांचे घर असून महामार्ग क्रॉस करत असताना त्यांना धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला असून अपघातानंतर गंभीर जखमी स्थितीतच तोरसकर यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

कारचालक ताब्यात

वागदे डंगळवाडी येथे शनिवारी सत्यवान महादेव तोरसकर यांना रस्ता ओलांडून जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेत त्यांना गंभीर दुखापती होऊन त्यांचा मृत्यू देखील झाला. मात्र धडक देणारा वाहन चालक हा धडक दिल्यानंतर पसार झाला. कणकवली पोलीस सदर गाडीचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याची दोन पथके देखील नेमली. तसेच सर्व हॉटेल, धाबे, गाड्या थांबवण्याची ठिकाणे या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील चेक केले. मात्र घटना घडली तेव्हा अंधार असल्याने पोलिसांच्या हाती ठोस काही लागत नव्हते. मात्र कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्या कार चालकाला शोधून काढले व सोबत ती कारही ( एम एच ०७ क्यू ३०५८ ) ताब्यात घेतली, अशी माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. तर कारचालक मुकेश मारुती मोडक ( वय ३४ ) रा. बोर्डवे मधलीवाडी याच्यावर भादवि कलम ३०४ (A)व अन्य कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.