एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नव्या संधी

सावंतवाडी,दि.५ मार्च
महाराष्ट्रासह देशातील महिला शिक्षणाचा वारसा समृद्धपणे चालवणाऱ्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे महिलांसाठी नवीन अभ्यासक्रम उपलब्ध केले असून त्यामध्ये मॅनजमेन्ट स्टडीज आणि मास मिडिया या विषयांचा अंतर्भाव आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरस्थ शिक्षण परिषदेच्या नियमावलीनुसार एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रास Bachelor of Management Studies (BMS) आणि B.A. in Mass Media या दोन अभ्यासक्रमांना फेब्रुवारी २०२४ आणि तदनंतरच्या सत्रास परवानगी प्राप्त झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया (फेब्रुवारी २०२४ सत्र) https://sndtoa.digitaluniversity.ac/ या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने लवकरच सुरु होणार आहे.

या व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये एम.ए. मराठी, एम.ए. हिंदी. एम.ए. इंग्रजी, एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. इतिहास, एम.ए. समाजशास्त्र हे विषय उपलब्ध असून बी.ए. पदवीकरिता मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांचे पर्याय विद्यार्थिनींना उपलब्ध आहेत. प्रवेशित विद्यार्थिनींना अभ्यास साहित्य ऑनलाईन माध्यमातून तसेच मार्गदर्शनपर व्याख्याने ऑनलाईन तासिकांच्या द्वारे उपलब्ध करून दिली जातील. परीक्षा केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असतील. प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि शैक्षणिक शुल्क याबाबतच्या तपशीलासाठी विद्यार्थिनींनी दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अधिकृत संकेत स्थळाला (website) भेट द्यावी.

दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे अभ्यासक्रम हे विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यता प्राप्त असून यातून प्राप्त होणारी पदवी नियमित अभ्यासक्रमांच्या पदवीशी समकक्ष आहे. विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरी करणाऱ्या तसेच उद्योजक महिलांना आणि शासकीय किंवा खासगी सेवेतील महिला यांना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे उपलब्ध आहे अशी माहिती केंद्राच्या संचालक डॉ. स्मृति भोसले यांनी दिली.