सावंतवाडी,दि.५ मार्च
ओटवणे गावचे सुपुत्र तथा असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक मिलिंद मधुसूदन गांवकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनतर्फे शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांचाहस्ते मिलिंद गावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिलिंद गावकर असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरमध्ये गेली २२ वर्षे विज्ञान विषयाचे अध्यापन करत असुन राज्य व जिल्हास्तरीय शिक्षक व विद्यार्थी प्रशिक्षण विकसक व तज्ज्ञ मार्गदर्शक, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्योत्सव व विज्ञान मेळावा आयोजन, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे आयोजित विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयांमधील मार्गदर्शक आणि विविध उपक्रमांसह, पत्रकारितेसह शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संपूर्ण देशात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यातील विज्ञान शाखेत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा अविष्कार फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा डॉ सुरेंद्र हेरकळ, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसन कुराडे, संयोजक रंगराव सूर्यवंशी, आयोजक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.