सावंतवाडी,दि.५ मार्च
येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल मधील इयत्ता आठवीतील २० विद्यार्थ्यांना श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले. आजगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघा मार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. संघाचे समन्वयक विनय सौदागर यांनी या विषयी बोलताना सांगितले की,”साने गुरुजींचे हे १२५ वे जन्मवर्ष आहे. कारुण्य हा स्थायीभाव असलेल्या गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक घराघरात जावे .सर्व विद्यार्थ्यांनी ते वाचावे व त्यातून त्यांचेवर चांगले संस्कार व्हावेत,हा या उपक्रमाचा उद्देश आहे.” मुले पुस्तक वाचून त्याचे परीक्षण लिहितील. उत्कृष्ट तीन परीक्षणांना अनुक्रमे ₹१००, ₹७५ व ₹५० अशी रोख बक्षीसे देण्यात येतील. पुस्तके व बक्षीसे यासाठीचा खर्च आपले वडील कै. वामन नारायण सौदागर यांच्या स्मरणार्थ सौदागर कुटुंबियांकडून करणेत आला. यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागीत सर यांचे सहकार्य लाभले. ते म्हणाले की,” प्रशालेला बँड देणे, व्याख्यान आयोजित करणे अश्या विविध उपक्रमातून माजी विद्यार्थी संघ प्रशालेला सहाय्यभूत होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.” यावेळी दिलीप पांढरे,एकनाथ शेटकर आदी उपस्थित होते.