सावंतवाडी दि.५ मार्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे अनेक प्रश्न आजमितिसही प्रलंबित असून जिल्ह्यात वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यापासून महावितरणला जाग आल्याचे चित्र समोर येत आहे. गेली अनेक वर्षे सुस्तावलेली महावितरणची व्यवस्था तात्काळ सुधारण्याची शक्यता नाही परंतु “नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही” या म्हणीप्रमाणे जिल्हावासियांनी एकजूट दाखवून महावितरण कडून आपले हक्क भांडून घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
भालावल ता. सावंतवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त होत महावितरण विरोधात १५ मार्च रोजी उपोषण करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना दिले. याच अनुषंगाने भालावल ग्रामपंचायतीने वीज ग्राहक संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संधान साधून भालावल ग्रामपंचायत येथे सोमवार दि. ४ मार्च रोजी संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला सरपंच समीर परब, उपसरपंच माजी सैनिक अर्जुन परब, वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, सदस्य कृष्णा गवस, अमित गुळेकर, रवींद्र परब, माजी सैनिक गोविंद परब, आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
भालावल येथे दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर वर्षभर व्यवस्थित चालला परंतु वर्षभरानंतर सदोष समान वापरल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ लागला. गावातील ज्या दहा शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती त्यांच्या शेतीपंपांना कमी दाबाने वीज पुरवठा सुरू राहीला परंतु परप्रांतीयांच्या केळीच्या बागांमध्ये मात्र सुरळीत वीज पुरवठा सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये गावातील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना जागृत झाली. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर करून आणलेला ट्रान्सफॉर्मर गावकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या विरोधात दि.१५ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे उपोषणास बसण्या बाबत निवेदन दिले.
भालावल ग्रामपंचायत व ग्रामस्थांसोबतच्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर आदींनी ग्रामस्थांना वीज ग्राहकांचे हक्क या संदर्भात मार्गदर्शन केले व गावातील विद्युत पुरवठ्या बाबतच्या समस्या जाणून घेत वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड व इतर पदाधिकाऱ्यांनी भालावल ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी बैठकीला खेमा परब, गंगाराम परब, सुजय परब, विष्णू मेस्त्री, विशाल राऊळ माडखोल, लक्ष्मण परब, शांताराम परब, नितीन परब, घारू परब, बाबली परब, राजाराम गावडे, सुरेश परब, गुंडू परब, विलास परब, राजेंद्र कामत, श्रीमती रुक्मिणी परब, दशरथ परब, श्रीकृष्ण परब, संतोष परब, वसंत बाबुराव परब, वसंत महादेव परब, दत्ताराम परब, गुरुनाथ परब, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


