२१ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला यश आले असल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त
सावंतवाडी,दि.५ मार्च
आंबोली हिरण्यकेशी येथे वन अनिर्णित जमीनीवरील अतिक्रमणे महसूल व वन विभागाने जमिनदोस्त केली. त्यासाठी भल्या पहाटे पासून ६ जेसीबीच्या सहाय्याने मोहीम हाती घेतली यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला यश आले असल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या नेतृत्वाखाली ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड व तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, आंबोली वनक्षेत्रपाल श्रीमती विद्या घोडके व फौजफाट्यासह उपस्थित होते.
आंबोली हिरण्यकेशी येथे कबुलायतदार गावकर जमीन वन अनिर्णित असून तेथे २७ बंगले, इमारतीचे बांधकाम सुरू होते. वन सदृष्य जमिनीत बांधकाम करता येत नाही पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने ते हटविण्याची मागणी करत सुमारे दोनशे महिला व पुरुष नागरिकांनी २१ दिवस साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाला पाठिंबा देत बळ दिले तसेच मनसे,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही पाठिंबा दिला.
दरम्यान उपोषणाच्या १८ व्या दिवशी आमदार तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर उपोषण स्थळी पोचल्यावर महिलांनी त्यांना धारेवर धरले होते.
वन विभाग व महसूल विभागाने ४८ तासात अतिक्रमणे हटवावीत अशी नोटीस दिली होती. काल सोमवारी सायंकाळी हि मुदत संपताच बांधकामावर हातोडा मारावा म्हणून आज सकाळी महसूल व वन विभागाने मोहन हाती घेतली. यादरम्यान वन व महसूल अशा सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल सकाळीच जमा करून घेत मोबाइलद्वारे संपर्क बंद करून अतिक्रमणे असलेला हिरण्यकेशी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी महसूल,वन व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. याठिकाणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांना अतिक्रमणे हटविण्यात येत असताना प्रवेश नाकारला गेला. अतिक्रमणे हटविण्याची कारवाई वेगाने, नियोजनबद्ध पद्धतीने करून बांधकामे जमीनदोस्त केली तर लोखंडी रॉड वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.