कणकवली दि .५ मार्च(भगवान लोके)
कणकवली मराठा मंडळ नजीक गडनदी वरील केटी बंधारा येथे नदीपात्रात मंगळवारी एका पुरुषाचा मृतदेह आढळला आहे.रात्री उशीरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
शहरातील मराठा मंडळ नजीक गडनदी वरील केटी बंधारा येथे पाण्यात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना एका व्यक्तीला दिसला.त्याबाबतची माहिती
वागदेचे पोलिस पाटील सुनील कदम यांना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यावर कणकवली पोलिस ठाण्यात माहिती दिली.त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, हवालदार उत्तम वंजारे, चालक किरण कदम, उज्वला मांजरेकर, पोलिस उपनिरीक्षक शेडगे घटनास्थळी दाखल झाले. काही नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
घटनास्थळावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पोलिसांनी ओळख पटविण्याच्या दृष्टीने मृतदेह दाखवला. मात्र,कोणीही त्या मृत व्यक्तीला पाहिले नसल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी तो मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेला.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.