श्री देव सपतनाथ मंदिर उभारण्यासाठी राजस्थान मधुन मंदिराचे बांधकाम करण्यासाठी साहित्य आणून पांडवां प्रमाणे एका रात्रीत मंदिर उभारले

मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बुधवारी सूर्योदयाच्यापूर्वी एका रात्रीत भल्या पहाटे पूर्णत्वास 

सावंतवाडी दि.६ मार्च 
पांडवांनी एका रात्रीत मंदिर उभारल्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. तसेच एक मंदिर दाणोली – बांदा रस्त्यावर सरमळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने दानशूर भाविकांनी उभारले.श्री देव सपतनाथ मंदिर उभारण्यासाठी देवाचा कौल झाल्यावर राजस्थान मधुन मंदिराचे बांधकाम करण्यासाठी साहित्य आणून पांडवां प्रमाणे एका रात्रीत मंदिर उभारले.

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील श्री सपतनाथचे मंदिर एका रात्रीत बांधण्याचा शुभारंभ काल मंगळवारी सूर्यास्तानंतर सायंकाळी उशिरा ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चारात आणि शेकडो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात करण्यात आला. या मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बुधवारी सूर्योदयाच्यापूर्वी एका रात्रीत हे मंदिर पूर्णत्वास भल्या पहाटे साडेचार वाजता आले. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासह मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी होती.

काल मंगळवारी सुर्यास्तानंतर मंदिर उभारण्यास सुरुवात झाली ते अखंड पणे करण्यात आले आणि रात्री साडेचार वाजता काम थांबविण्यात आले. राजस्थान हुन मंदिर सामान, कामगार दाखल झाले होते. माजी आमदार शिवराम दळवी यांनी कुटुंबासह उपस्थिती दर्शविली. त्यांनी भल्या पहाटे पर्यंत उपस्थित राहून मंदिराचे स्वप्न पूर्ण होताना पाहिले त्यावेळी सरमळे सपतनाथ देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या धार्मिक सोहळ्यासाठी मंगळवारी सकाळी ग्रामदैवत सातेरी भगवतीची पालखी, तरंगे, निशाण काठी सवाद्य मिरवणुकीने चार दिवस या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झाली. या उत्सवासाठी सायंकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सपतनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे हे मंदिर एका रात्रीत साकारण्यासाठी क्षणाचीही विश्रांती न घेता हे मंदिर भक्तीमय वातावरणात पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. यात पंचक्रोशीतील कारागीरांनी या मंदिर बांधकामात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी होमहवन आदी धार्मिक कार्यक्रमासह हर हर महादेवचा जयघोष सुरूच होता. यावेळी विलवडे येथे वीस वर्षांपूर्वी एका रात्रीत बांधण्यात आलेल्या खांबदेव मंदिराच्या आठवणींना भाविकांनी उजाळा दिला.
यानिमित्त सरमळे गावात उत्साहाचे वातावरण होते. या धार्मिक सोहळ्यासाठी माहेरवाशिणीसह चाकरमानीही गावात दाखल झाले होते. या धार्मिक सोहळ्यानिमित्त महाशिवरात्रीपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा – दाणोली या जिल्हा मार्गालगतच हे मंदिर असल्यामुळे मंदिर बांधकामाच्यावेळी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने पर्यायी रस्ता करण्यासह या उत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.मंदिराच्या या जिर्णोद्धारात सरळमळेवासियांसह सपतनाथचा निस्सीम भक्त असलेल्या गोवा येथील एका भाविकाचा यात सिंहाचा वाटा आहे.
मंदिर साकारल्यानंतर बुधवारी ६ मार्च रोजी दिवसभर मंदिराची सजावट करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासुन स्थानिक व पंचक्रोशीतील भजनांचा गजर रात्रभर सुरूच ठेवला. गुरुवारी ७ मार्च रोजी सकाळपासून श्री सपतनाथ व इतर मूर्तींची ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दुपारी आरती आटोपल्यानंतर महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ३ वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे. शुक्रवारी ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, त्यानंतर अवसारी कौल मिळाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रारंभ होणार आहे.