अर्चना घारे; महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून नवोदित अधिकार्यांचा सन्मान…
सावंतवाडी, दि.७ मार्च
कुठेच नाही इतके कोकणातील मुलांमध्ये “टॅलेंट” आहे. त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हे कौतुकास्पद काम सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सुरू आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे यांनी आज येथे व्यक्त केले. आपल्याला कॉलेज जीवनात जिल्हाधिकारी व्हायचे होते. परंतु त्यानंतर लग्न झाल्यामुळे माझी इच्छा अपुर्ण राहिली. मात्र त्यानंतर मी राजकारणात येवून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी होवून सामाजिक काम करण्याचा अनुभव वेगळा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी होवून यश संपादन करणार्या पियुषा वारंग, नागेश दळवी, दिनेश पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित गोते, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग जिल्हा डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, व्याख्याते रुपेश पाटील, महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणकर आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. घारे म्हणाल्या, कोकणातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. मात्र दहावी, बारावी नंतर ते दिसत नाही. संबंधित मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महेंद्रा अकॅडमी सारख्या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही निश्चितच करू.
यावेळी लखमराजे भोसले म्हणाले, या ठिकाणी स्पर्धा परिक्षा देणार्या मुलांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढण्यासाठी पालक आणि शिक्षकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. येणार्या काळात मी मुंबई विद्यापीठाचा सिनेट मेंबर म्हणून सिंधुदुर्गात कौन्सिलिंग सेंटर सुुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
श्री. पवार म्हणाले, या ठिकाणी येणारे अधिकारी हे उत्तर प्रदेश, बिहार येथील असतात. मग आम्ही नेमके कोठे कमी पडतो, याचा अभ्यास होण्यासाठी तेथील विद्यापीठात येथील विद्यार्थ्यांनी जावून अभ्यास करावा.
श्री. टेंबकर म्हणाले, स्पर्धा परिक्षांसाठी मुले जात नाहीत अशी ओरड केली जाते. परंतु त्या मागचे नेमके कारण काय, अशा प्रकारचे शिक्षण देणार्या संस्था जगविण्यासाठी काय करता येईल यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.