माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे शिक्षक स्वप्निल पाटील ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे,दि.७ मार्च

वैभववाडी तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यातील विज्ञान शाखेत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आविष्कार फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आला होता. विज्ञान शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या व करत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन 2023-24 साठी हा राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा गौरव वितरण सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.सुरेंद्र हेरकळ हे होते तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसनराव कुराडे , संयोजन रंगराव सूर्यवंशी यांनी केले तर आयोजन संजय पवार यांनी केले होते.
स्वप्निल पाटील हे सतत शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात. स्कॉलरशिप , एनएमएमएस परीक्षा , अपूर्व विज्ञान मेळावा , विज्ञान प्रदर्शन , विज्ञान नाट्य उत्सव ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या माध्यमातून सतत त्यांचे गणित विज्ञान विषयक कार्य वैभववाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्याहत चालू आहे. ते शिक्षक भारती संघटनेचे वैभववाडी तालुका सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक म्हणून काम पाहत आहे
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वप्निल श्रीकांत पाटील यांचा शिक्षक भारती वैभववाडीचे अध्यक्ष अविनाश शामराव कांबळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पाटील , सचिव संजयकुमार खिमा आडे, संघटक रामचंद्र शिवराम घावरे,राजाराम बिडकर,पदाधिकारी व सदस्य यांच्यातर्फे स्वप्निल श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.