मालवण,दि. ७ मार्च
कोकण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर वर एलइडी लाईट द्वारे होणारी मासेमारी वाढली असून यामुळे स्थानिक पारंपारिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. या मासेमारी मागे रत्नागिरी मधील एका राजकीय पक्षाचा बडा नेता असून त्या नेत्याचे एलइडी लाईट मासेमारी मध्ये असलेले योगदान पारंपारिक मच्छिमारीला घातक ठरत आहे. त्या नेत्याकडून रत्नागिरीचा मासेमारी पॅटर्न सिंधुदुर्गात राबविण्याचा तसेच जिल्ह्यातील एलइडी मच्छिमारांना घेऊन आपली फौज तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र याबाबत पारंपारिक मच्छिमार गप्प बसणार नसून हा प्रकार थांबला नाही तर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सर्व पारंपारिक मच्छिमार त्या नेत्या विरोधात निषेध दर्शवतील, असा इशारा मालवण मधील मच्छिमार नेते छोटू सावजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मच्छिमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत आहेत. परंतु गेली काही वर्ष कोकण किनार पट्टीवर पारंपरिक मासेमारी कमी होत झाल्याचे दिसत आहेत. याला कारणीभूत वाढलेली मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर व एलईडी लाईट मासेमारी आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोट्या प्रमाणात मलपपी ट्रॉलर व एलईडी लाईट मासेमारी केली जात आहे, यामुळे येथील पारंपरिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. पारंपरिक मच्छिमार हा नेमीच संघर्ष करत आला असून विविध समस्यांनी त्रस्त राहिलेला आहे. त्याचप्रमाणे येथील स्थानिक आमदार, खासदार देखील मच्छिमारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून गेली आठ वर्ष आमदार खासदार सत्तेत राहून देखील पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न सोडवले गेले नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारनांचे रोजगार धोक्यात येऊन दुष्काळाचे परिस्थिनी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच भर म्हणून रत्नागिरी वरून एक नेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडी लाईट द्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना घेऊन आपली फौज तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर लवकरात लवकर आळा घालायची गरज आहे. हा प्रकार थांबला नाही तर पारंपरिक मच्छिमार त्या नेत्या विरोधात निषेध दर्शवणार आहेत, असे छोटू सावजी यांनी म्हटले आहे.