जगात देश तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प – ना.नारायण राणे

लोकसभेचा खासदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा ;कणकवली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेकडे चालला आहे. आता जगात आपला देश पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. २०३० सालापर्यंत दरडोई उत्पन्नात आपला देश तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे.प्रामाणिकपणे,निष्ठेने एकत्रितपणे काम करुन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला बहुमताने जिंकून आणण्यासाठी कामाला लागा,असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.तीन पक्षांचा हा मेळावा आहे,लोकसभेचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी जनतेला ५४ योजना दिल्या आहेत.
८० कोटी लोकांना धान्य मोफत दिले, आयुष्मान योजना, उज्वला योजना ,मोफत घराची योजना,नळ पाणी योजना आहेत,त्याचा लोकांना लाभ मिळतोय. लोकांमध्ये जाऊन या योजनांची माहिती सांगा. त्याची लाभार्थीना जाणीव करुन द्या. फक्त नुसती चर्चा न करता आपण काम केले पाहिजे.आदिवासी भागात पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यात गेलो.साडेतीन कोटी घरे दिली.गरिबांना चांगले दिवस दाखवण्याचे काम भाजपा करेल.बॅनर आता नको,आम्ही उमेदवार ठरल्यावर लावू.नवरीचा पत्ता अजून नाही, असा टोला नाव न घेता शिवसेनेला ना. नारायण राणे यांनी लगावला.

जग विश्व गुरु म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहत आहेत.कोणत्या पक्षात कोण दानशूर नेते आहेत,आपल्या हक्काचा माणूस म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी आपला खासदार असला पाहिजे.जिल्ह्यात ९० साली आलो तेव्हा रस्ते नव्हते,शाळेत शिक्षक नव्हते,फेब्रुवारी नंतर पाणी नव्हते,आता २ लाख ४० हजार दरडोई उत्पन्न झाले आहे.पुढच्या ५ वर्षात जिल्ह्याचा कायापालट होईल. जे जवळ गेले नाहीत,ते आता बाळासाहेब कसे हे सांगताहेत.सामना काढला तेव्हा संजय राऊत नोकरीला आला.आता तोच जास्त बोलतो.ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका होता.तेव्हा मी सोबत होतो . माझ्या एवढा बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास कोणाला लाभला नाही.साहेबांच्या तोंडून शब्द निघाला तेव्हा तो केव्हाच पडला नाही.माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास आम्ही सहन करणार नाही.राममंदिर पूर्णत्वास कोणी नेलं ते मोदींनी.आपण कोकणातील आहोत,जिद्दी असतात,बुद्धिजीवी असतात.या भूमीत विश्वासाहर्ता महत्वाची आहे.प्रामाणिक वागा. तिन्ही पक्षाला सांगतो,नांदा सौख्यभरे हे वाक्य आहे.

ना.दीपक केसरकर म्हणाले,अगोदर युती दोन पक्षांची होती,आठवले गट सहभागी झाल्यावर महायुती म्हणतो.समन्वयक कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे आ.नितेश राणे आहेत.जिल्हा नियोजन साठी २६० कोटी माझ्या काळात निधी होता,आमचे ४५० कोटी मागे घेतले आहे.जनमताचा अनादर केला म्हणून आम्ही ठाकरेंची साथ सोडली. आता लोकांना सर्वजण आपण एकत्र आलो हे दाखवा.कुणीही उमेदवार असला तरी निवडून आला पाहिजे.जनतेला जावून सांगा सरकारच्या योजना.पुढच्या तीन महिन्यात सिंधुदुर्गात दिसेल अशी कामे करुन दाखवू.

ना.अदिती तटकरे म्हणाल्या,या राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम केलं जात आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.येत्या निडणुकीमध्ये मोदींचे हात बळकट करण्याची गरज आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहचविण्यासाठी काम केलं पाहिजे.महिला संघटनांनी अधिकाधिक काम केलं पाहिजे. लाभार्थी वाढले की ते मतदार वाढतात.आज संकल्प केला पाहिजे राज्यात सर्वच खासदार निवडून आले पाहिजेत.मोदींना राज्यातून जास्त खासदार निवडून दिले पाहिजेत.जिल्ह्याचा विकासासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.कोकणला लागेल तेवढा पैसा दिला जाईल.

कणकवली येथील महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला व्यासपीठावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर,बालविकास मंत्री आदिती तटकरे,आ.नितेश राणे,माजी आ.राजन तेली ,माजी आ.अजित गोगटे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे,अशोक दळवी,बँक अध्यक्ष मनीष दळवी,कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर,अविनाश चमणकर,सावळाराम अणावकर, सचिन वालावलकर,मनोज रावराणे,रणजित देसाई,संतोष कानडे,रुपेश पावसकर,संदीप मेस्त्री,सुरेश गवस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.