मालवण,दि.८ मार्च
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघ च्या विविध पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आयोजित केली. यावेळी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर उपरकर व पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच भविष्यातील लढ्यासाठी गाबित समाज सदर भूमिकेच्या पाठीशी ठाम उभा राहील, अशी ग्वाही उपरकर यांनी दिली .
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी गाबित समाजाला भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अखिल भारतीय गाबित समाज यांनी गाबित समाजा संदर्भात प्रकाशित केलेले ‘गाबित’ हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी गाबित समाज जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल व इतर मान्यवर उपस्थित होते.