मुलींनी आई वडिलां बरोबरच आपल्या शाळेला आपल्या गुरुजनांना अभिमान वाटावे असे काम करावे-पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत

मालवण ,दि.८ मार्च
आज महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करताना , कर्तव्य बजावताना कर्तृत्व ही सिद्ध केले आहे. अशा महिलांचा विद्यार्थिनींनी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ज्ञान संपादन करावे. मुलींनी सर्व स्पर्धामध्ये तसेच क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होत आपल्या आई वडिलां बरोबरच आपल्या शाळेला आपल्या गुरुजनांना अभिमान वाटावे असे काम करावे असे प्रतिपादन मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत आणि माजी विद्यार्थिनी मानसी डिचवलकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कु. खोत या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, आर. डी. बनसोडे, प्रफुल्ल देसाई, माजी विद्यार्थीनी कुमारी. मानसी डिचवलकर, सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर, संजना सारंग मॅडम, सुनंदा वराडकर, चव्हाण मॅडम आदी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सौ. बांदेकर मॅडम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृषी विषयाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया मध्ये कृषी विषयात प्रशिक्षण घेऊन आलेल्या कुमारी. मानसी डिचवलकर हिचा पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर खोत मॅडम यांचा बांदेकर मॅडम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सत्कार मूर्ती मानसी डिचवलकर म्हणाली, प्रत्येक मुलाने आईवडीलांना आनंद होईल आणि आपल्या शाळेला अभिमान वाटेल अशापद्धतीने काम केले पाहिजे. आई वडिलां बरोबरच भंडारी हायस्कुलने जी संस्काराची शिदोरी दिली ती आजही आपल्याला उपयोगी पडत आहे. यामुळे आपल्या जीवनात आई वडिलां बरोबरच शाळेलाही जीवनात महत्वाचे स्थान असून शाळेला कधी विसरू नका असे सांगितले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी सांगितले, महिलांचा आदर करणे गरजेचे आहे. कुटुंबामध्ये देखील लहान मुलांना पहिल्यापासूनच स्त्री चा आदर करावा हे शिकवले पाहिजे. आज महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावले आहे. मुलींनी सर्व स्पर्धा परीक्षामध्ये तसेच क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झाले पाहिजे. आपण आपले कर्तृत्व पदोपदी सिद्ध केले पाहिजे यामुळे आपल्या आई वडिलांची तसेच आपल्या गुरुजनांना आपला अभिमान वाटला पाहिजे. मी गरिबीतूनच आज इथपर्यंत पोहोचली आहे माझे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले आहे. मनात जिद्द चिकाटी असेल तर आपण काहीही करू शकतो त्यामुळे महिलांनी स्वतःला कधी कमी समजू नये.असे सांगून त्या म्हणाल्या आजही महिलांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत आहेत याला आळा घालण्यासाठी भारत सरकारने महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे केलेले आहेत. शाळा कॉलेजमध्ये मुलींची होणारी छेडछाड यासाठी देखील कायदा आहे तसेच लग्न झालेल्या महिलांवर देखील कौटुंबिक होणारा छळ यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला आहे. आजकाल सर्वचजण सोशल मीडियावर सक्रिय असतात याचा वापर अधिक केला जातो. यामध्ये अनोळखी व्यक्तीसोबत संपर्कात येऊन होणारे गैरप्रकार जास्त घडत असल्याने प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे असेही त्या म्हणाल्या
शेवटी चव्हाण मॅडम यांनी आभार मानले