सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामपंचायत येथे महिलांसाठी कौटुंबिक उद्बोधन कार्यशाळा संपन्न

मालवण ,दि. ८ मार्च

बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण यांच्या वतीने आणि मालवण तालुका विधी सेवा समिती, व जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अधिनस्त अभय केंद्र, मालवण यांच्या सहकार्याने सर्जेकोट- मिर्याबांदा ग्रामपंचायत येथे महिलांसाठी कौटुंबिक उद्बोधन मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या व ग्रामसंघ सचिव सौ. वैशाली आडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. समुपदेशक अदिती कुडाळकर यांनी उपस्थित बचत गटातील महिलांना कौटुंबिक सल्ला केंद्राची माहिती देत मार्गदर्शन केले. त्यानंतर अभय केंद्राच्या सहाय्यक संरक्षण अधिकारी मेघा वजराटकर यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा व महिलांना त्यापासून मिळणारे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी असणाऱ्या सेवा योजनांबाबत माहिती दिली. तालुका विधी सेवा समिती मालवणच्या कायदेविषयक सल्लागार ऍड. प्राजक्ता गावकर यांनी महिलांविषयी असणाऱ्या विविध कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तालुका स्तरावर असणाऱ्या तालुका विधी सेवा समितीची माहिती देवून, येथे शासना तर्फे महिलांना मोफत वकील दिला जातो आणि महिलेला कायदेशीर अधिकार मिळवून दिले जातात. परंतु, कायद्याचा वापर हा स्वतः च्या संरक्षणासाठी करावा. त्याचा गैरवापर करू नये, असे सांगत महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ऍड. अमृता मोंडकर यांनी सायबर क्राईम, पोक्सो कायद्याबाबत महिलांना माहिती दिली. तसेच महिलांना काही समस्या असल्यास कौटुंबिक सल्ला केंद्र, अभय केंद्र किंवा तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधण्यास सांगितले. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, ग्रामपंचायत सदस्य उषा मुंबरकर, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी लक्ष्मण कांबळी, एस. बी. चिंदरकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक विजय कुडाळकर, अभय केंद्राच्या कर्मचारी निकीता पाटकर व बचत गटातील महिला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सर्जेकोट मिर्याबांदा कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अदिती कुडाळकर यांनी केले. महिलांना माहितीपत्रके वाटून या कार्यक्रमाची सांगता झाली.