जिल्ह्यातील विकास कामांसाठी 3 हजार 341 कोटी रुपयांची कामे सुरू
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन
सिंधुदुर्गनगरी,दि. ८ मार्च
विविध विकासकामे आणि प्रकल्प राबवून जिल्ह्याच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. शासनाने सुमारे 3 हजार 341 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी एकूण 4 हजार 591 कोटी एवढा निधी खर्च करून विविध विकास कामे केली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या 29 कामांचा व मुख्यमंत्री सडक योजनेतील 52 रस्त्यांचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विकास समिती कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. आपल्या राज्याची देखील विकासाकडे घोडदौड सुरू आहे. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात 209 कामे व 850 कोटी ,कुडाळ मतदार संघात 119 कामे व 657 कोटी सावंतवाडी मध्ये 255 कामे व 668 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्याशिवाय अकराशे कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामावर खर्च होत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणखी बळकट करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. काजूला अनुदान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.