पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खास.विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी रूग्णालयात भेट घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, तसेच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दिली भेट

सावंतवाडी दि.८ मार्च
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असे मेडिकल ऑफिसर वर्षा शिरोडकर यांनी सांगितले.

दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी रूग्णालयात भेट घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मते ८० तर उपप्राचार्य ए जी कांबळी यांनी १३३ विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार केल्याचे म्हटले आहे.

सांगेली नवोदय विद्यालयात सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरूवारी रात्री जिरा राईस, बटाटा भाजी,डाळ असे भोजन घेतले.रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाब सुरू झाल्याने प्राथमिक उपचारानंतर सागेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ६ वाजता दाखल करण्यात आल्याचे प्राचार्य एम के जगदीश व उपप्राचार्य ए जी कांबळी यांनी पालकांशी बोलताना सांगितले.

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल शंभरहून अधिक मुला मुलींना पहाटे चार वाजल्यापासून जुलाब व उलटी सुरू झाली. नवोदय विद्यालय प्रशासनाकडून तातडीने या विद्यार्थ्यांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यातील काही विद्यार्थी हे जुलाब व उलटी ने घायाळ झाले होते. त्यांना लागलीच उपचार देण्यात आले आहेत. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी रूग्णालयात दाखल होत विद्यार्थ्यांना धीर दिला, असे सरपंच लवू भिंगारे यांनी सांगितले.

गुरूवारी रात्रीचे जेवण विद्यार्थ्यानी मेसमध्ये घेतले त्यानंतर ते झोपी गेले होते. त्यातच पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक कारण चौकशीत पुढे आले आहे. जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज शाळेतील शिक्षकांकडून , पालकांकडून वर्तविण्यात येत आहे.
नवोदय विद्यालयातील १३३ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात आले, असे उपप्राचार्य ए जी कांबळी यांनी बोलताना सांगितले तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी नवोदय विद्यालयात भेट दिली तेव्हा ८० विद्यार्थी असल्याचे म्हणाले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी १३ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे,डॉ मुकुंद अबांपुरकर, डॉ धीरज सावंत यांनी तर सांगेली येथे तालुका मेडिकल ऑफिसर वर्षा शिरोडकर, डॉ आरोंदेकर स्वतः हजर होत्या. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरसोयी होत्या तरीही विद्यार्थ्यांना जमिनीवर बेडसीट घालून झोपायला लावले आणि उपचार करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, तसेच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट दिली. ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा यांनी सांगेली नवोदय विद्यालय व रूग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली तसेच मुलांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात केळी व बिस्किट वाटप केले. सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी सकाळ पासून उपस्थित राहून धावपळ केली.
प्राचार्यांना धारेवर धरले
————————-
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिल्यानंतर ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ मायकल डिसोझा यांनी नवोदय विद्यालयात प्राचार्य एम के जगदीश यांची भेट घेतली तेव्हा संतप्त पालकवर्ग देखील उपस्थित होते. नवोदय विद्यालय चेअरमन जिल्हाधिकारी आहेत त्यांना आणि पालकांना घटना कळविली नाही म्हणून जाब विचारला तर काही पालकांनी जेवणाबद्दल आक्षेप घेतला. या घटनेनंतर पालकांना संपर्क साधला नसल्याने पालक संतप्त झाले.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट
———————————–
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना घटना कळताच त्यांनी धाव घेतली. त्यांच्यासोबत तहसीलदार श्रीधर पाटील होते. प्राचार्यांना धारेवर पालकांनी जेवणाबद्दल धरले असतांनाच जिल्हाधिकारी किशोर तावडे पोहोचले. प्राचार्यांबद्दल पालकांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर तीव्र नापसंती व्यक्त करून अन्नातून विषबाधा प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करून कारवाई करावी तसेच प्राचार्य एम के जगदीश यांच्या हलगर्जीपणा धोरणामुळे पालकांना मनस्ताप झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी यांची भोजनालय पाहणी
———————————————
ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ मायकल डिसोझा मयुरी पाटील आणि पालकांनी भोजन कक्षाची पाहणी करावी अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे भोजनालय कक्षात पोहोचले. यावेळी खराब भाजी दाखवून चपाती भाजली जाते तेथे पाहणी केली. तसेच भाजी पुरवठादार खराब भाजी पुरवठा करत आहे त्यामुळे टेंडर रद्द करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले, प्रथम विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल त्यानंतर साऱ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे आश्वासन पालकांना दिले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन विचारपूस केली तर नवोदय विद्यालय प्राचार्य एम के जगदीश यांना निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे,माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, सांगेली सरपंच लवू भिंगारे व मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना संपर्क साधला. त्यांनी वैद्यकीय अधिकारी व उपप्राचार्य यांच्याशी चर्चा केली.तसेच रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले.माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थांची भेट घेऊन चर्चा केली दरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री यांना या घटनेची माहिती मेलद्धारे देऊन चौकशी करण्याची मागणी करत आहोत असे सांगितले.
दरम्यान उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे आणि मेडिकल ऑफिसर वर्षा शिरोडकर यांना संपर्क साधला असता सर्व विद्यार्थ्यांची तब्येत सुधारत आहे असे सांगितले.