गरज ओळखून योग्य मार्ग निवडल्यास महिला आपल्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहू शकतात-सौ.श्रावणी मदभावे
तळेरे,दि.९ मार्च
महिलांनी आज प्रत्येक गोष्टीत अतिशय सजक आणि सतर्क राहिले पाहिजे. त्यासाठी आपली विचारांची कवाडे नेहमीच उघडी ठेवावी लागतील. आपली इच्छाशक्ती नेहमीच प्रबळ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सकारात्मक विचार केला पाहिजे. महिलांना आपल्या जीवनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवायचा असेल तर नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी. फसवणूक आणि अत्याचाराच्या बाबतीत महिलांना खूप मोठा त्रास आजही समाजात सहन करावा लागत आहे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणून आपली गरज ओळखून योग्य मार्ग निवडल्यास महिला आपल्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहू शकतात असे प्रतिपादन सौ.श्रावणी मदभावे यांनी केले.
कणकवली तालुक्यातील नडगीवे ग्रामपंचायत आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तसेच प्रज्ञांगण परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन जि. प. प्राथमिक शाळा नडगीवे प्रशाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी “सायबर सिक्युरिटी” या विषयावरती ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कणकवली तालुका महिला संघटक तसेच श्रावणी कॉम्प्युटर सेंटर, तळेरेच्या संचालिका सौ.श्रावणी मदभावे बोलत होत्या.
याप्रसंगी प्रज्ञांगण परिवाराचे संचालक- सतीश मदभावे, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक यांनी विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी नडगिवे सरपंच सौ.माधवी मण्यार, शेर्पे सरपंच सौ.स्मिता पांचाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांच्यासह महिला तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सतीश मदभावे यांनी उपस्थित महिलांना सायबर सुरक्षिततेसाठी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे. तसेच स्मार्ट फोन मधून होणाऱ्या आर्थिक फसवणूकीचे दाखले दिले. त्याचबरोबर मोबाईलचे विद्यार्थ्यांवरती होणारे घातक दुष्परिणाम याविषयीची अनेक उदाहरणे देऊन सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती घातक आहेत यासाठी आपण महिलांनी,पालकांनी तसेच मुलांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याविषयी बहुमान असे मार्गदर्शन केले.
तर संतोष नाईक यांनी सायबर गुन्हेगारी कशी घातक आहे त्याविषयी काही उदाहरणे देऊन त्याचे महत्त्व पटवून दिले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तर सरपंच सौ.माधवी मण्यार यांनी मान्यवरांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.तसेच आपल्या प्रास्ताविकात जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि शेवटी आभार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक संदीप कदम यांनी केले.