सावंतवाडी,दि.९ मार्च
जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे विद्यार्थाना अन्नातून विषबाधा झाल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी भोजन कक्षाशी संबंधितां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सात जणातील ६ जण स्थानिक आहेत. या मध्ये प्रशासनातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने पालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४५० विद्यार्था पैकी तब्बल १५५ हून अधिक विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली होती. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी नवोदय विद्यालय प्रशासन व किचन व्यवस्थापनातील एकूण सात जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मध्ये अजय चंद्रभूषण प्रसाद कुमार, हेमंत दत्ताराम परब, महेश सोमाकांत कुडतरकर, संतोष बापू काळे, प्रवीण पुंडलिक कुडतरकर गणू राजाराम म्हाडगूत, समीर रामचंद्र पालक यांचा समावेश आहे तसेच चौकशी अंती आणखीही काही जण असतील तर त्यांचा समावेश केला जाणार आहे असे पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या १५५ हून अधिक विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली होती त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांवर शुक्रवारी सांगेली आणि येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी विद्यालयाच्या किचन व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद बीट अंमलदार संतोष गलोले यांनी पोलिस ठाण्यात दिली त्यानुसार एक ते सात संशयित आरोपींनी एकत्रितपणे जेवण केले व योग्य ती काळजी न घेतल्यामुळे विषबाधा झाली यामुळे विद्यार्थ्यांना ताप, पोट दुखणं,उलटी, जुलाब व शारीरिक त्रास सहन करावा लागला व त्रास होईल अशी कृती केली म्हणून त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३३६,३३७,२७३,२९०,३४ आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.
दरम्यान याप्रकरणी भोजन कक्षाशी संबंधितां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतरांना वगळण्यात आले आहे. शुक्रवार पासून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या समोर पालक आणि सांगेली परिसरातील स्थानिक लोक पोटतिडकीने शालेय प्रशासनावर बोट ठेवून तक्रार करत आहेत मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.