खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पालक आणि रुग्णांची विचारपूस केली

सावंतवाडी दि.९ मार्च 
जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर रत्नागिरी दौऱ्यावर असणारे खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी रात्री सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पालक आणि रुग्णांची विचारपूस केली यावेळी त्यांनी आपण केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या संबंधितांच्या कानावर ही बाब घातली असून त्यांची एक टीम सांगेली येथे येऊन चौकशी करेल अशा विश्वास व्यक्त केला.
खासदार विनायक राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार ,मायकल डिसोझा, सुहास गंवढळकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी विचारपूस केली तसेच प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर ऐवले यांच्याशी चर्चा केली.
यानंतर पालकांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर नवोदय विद्यालयाचे प्रशासनाच्या हलगर्जीपणाची पाडा वाचला .मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर त्यांच्या पालकांना कळवणे आवश्यक होते .मात्र याबाबतची पालकांना प्राचार्य यांनी माहिती दिली नाही त्याबाबत नापसंती व्यक्त केली. पालक मयुरी पाटील यांनी तर भोजनालय कक्ष आणि स्वच्छतागृह बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त करत मुलांना स्वच्छतागृह साफ करण्यास नवोदय विद्यालयाचे कर्मचारी ,अधिकारी सांगत असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, आपण याबाबत जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जाऊन प्राचार्य यांच्याशी चर्चा करू तसेच याबाबत आपण तात्काळ मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संपर्क साधला असून त्यांची टीम या ठिकाणी येऊन चौकशी करेल. पालकांनी प्राचार्य आणि विद्यालयाच्या स्टाफ विरोधात नाराजी व्यक्त केली त्याबाबतही पालकांनी केलेल्या निवेदनाची प्रत दिल्यावर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल.