मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुमित मोंडकर सेवेत रुजू

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत

 मालवण,दि.९ मार्च

मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असतानाच रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून देवगड येथील डॉ. सुमित मोंडकर हे सेवेत रुजू झाले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर पदांच्या नियुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. मोंडकर यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या हि मोठी समस्या बनली असून महिन्या भरापूर्वी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रश्नी मालवण ग्रामीण रुग्णालयात हजर झालेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची भेट घेऊन आक्रमक भूमिका मांडून रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध झालेच पाहिजेत अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता. शासनाकडून डॉक्टर भरती प्रक्रिया सुरु असून ती पूर्ण झाल्यावर रुग्णालयातील विविध पदे भरली जाणार आहेत, मात्र तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी डॉ. पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आता देवगड येथील डॉ. सुमित मोंडकर यांची मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गट अ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मोंडकर हे एमबीबीएस पदवी धारक असून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण रशिया मध्ये पूर्ण केले आहे.

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात डॉ. सुमित मोंडकर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच तालुक्याचे रुग्णालय असलेल्या या रुग्णालयात जनतेसाठी डॉक्टर उपलब्ध असणे आवश्यक आहे, नवीन नियुक्त डॉक्टरांकडून जनतेला चांगली सेवा मिळावी अशी आशा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, पूनम चव्हाण, तपस्वी मयेकर, जयमाला मयेकर, उमेश मांजरेकर, नरेश हुले, बंड्या सरमळकर आदी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.