‘नवतेजस्विनी महोत्सव’ महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन
कणकवली दि.९ मार्च(भगवान लोके)
महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करणे, ही बाब सोपी आहे. मात्र त्या महिलांनी उत्पादित केलेले मालांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महिला सशक्तीकरणाचे काम महिला व बाल विकास विभाग मंत्री अदिती तटकरे या उत्तमरीत्या करीत आहेत. महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत अशा प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून महिलांना एक बाजारपेठ मिळवून देण्याचे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग (महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम) द्वारा हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, कणकवली नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत ‘नवतेजस्विनी महोत्सव’ महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री चे उद्घाटन शनिवारी आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, संजना सदडेकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली चे अध्यक्षा उदयमती देसाई, व्यवस्थापक सीमा गावडे आदी उपस्थित होते.
आ. नितेश राणे म्हणाले, येथील स्थानिक महिलांना खऱ्या अर्थाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यांना जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या मॉल, डी मार्ट अशा मोठ्या बाजारपेठेमध्ये या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू किंवा पदार्थ तिथे कशाप्रकारे पोहचवला जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथील स्थानिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू किंवा पदार्थ ज्यावेळी बाहेरील मॉल व डी मार्ट मध्ये उपलब्ध होतील त्यावेळी अशा प्रकारचे अभियान यशस्वी झाले असे म्हणता येईल. त्यामुळे येथील महिलांना जास्त मोठे बाजारपेठ कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष द्यावे .
नितीन काळे म्हणाले, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान ऑक्टोंबर २०२३ पासून सुरू झाली असून ऑक्टोबर २०२४ मध्ये या अभियानाचा समारोप होणार आहे. या एका वर्षामध्ये या अभियानांतर्गत १२ महिन्यांमध्ये १२ विविध उपक्रम राबवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले आहे. या अभियानाचा मुख्य घटक महिला असल्याने त्यांचे सशक्तिकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शक्ती ॲप निर्माण केला आहे या या शक्ती ॲप मध्ये महिलांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना ९९ प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. असे श्री. काळे यांनी सांगितले.
या अभियानादरम्यान शक्ती ॲपवर महिलांची नाव नोंदणी करण्यात आली. या प्रदर्शनाची सुरुवात “इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना” या प्रार्थनेने करण्यात आली.
या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध बचत गटामार्फत ३० स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कपडे, लाकडा पासून बनवलेल्या वस्तू, अन्नपदार्थ, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा सहभाग आहे. या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.