सावंतवाडी, दि.१० मार्च
सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात जेवणातून विषबाधा झाल्याने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांची काल शनिवारी रात्री आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी उपस्थित पालकांनी विद्यालयातील भोजनालय, शौचालय, वसतिगृहे अशा विविध समस्यांबाबत नितेश राणे यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान श्री. राणे यांनी मोबाईल द्वारे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करत याबाबत त्यांना जाब विचारला व येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा सुरू असल्याकारणाने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू असे श्री. राणे म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सुधीर आडीवरेकर, केतन आजगावकर, उदय नाईक, साईनाथ जामदार आदी उपस्थित होते.