कणकवलीत कै. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा
कणकवली दि.११ मार्च(भगवान लोके)
कणकवली कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे गेली १४ वर्षे जे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. या ट्रस्टने शैक्षणिक साहित्य संगीत अभिनय क्षेत्रातील आदर्श रत्न निवडून त्यांचा केलेला गौरव हे काम रत्नपारख्यांचे आहे. मुळात रत्नपारखायला दृष्टिकोन लागतो, त्यामुळे काणेकर ट्रस्टचे मी अभिनंदन करतो असे भावोद्गार प्रसिद्ध नाटककार वस्त्रहरण फेम गंगाराम गवाणकर यांनी काढले.
कणकवली येथे कै. सौ उमा काणेकर पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी काणेकर ट्रस्टच्या पुरस्कार प्राप्त गुणवंतासह, वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर, साहित्यिक बाबुराव शिरसाट, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, ट्रस्ट चे अध्यक्ष महेश काणेकर, डॉ. बि. एस. महाडेश्वर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आप्पा काणेकर उमा काणेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदीन असल्याने त्यांच्याही प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पूर्वी स्वर संदेश कराओके यांच्यामार्फत मराठी हिंदी गीतांचा बहारदार कराओके कार्यक्रम सादर करण्यात आला.तसेच स्वर संदेश कराओके चे संचालक गायक यांचा ट्रस्ट मार्फत सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत संस्थेचे ध्येयधोरण आणि कामाचा आढावा घेतला.यावेळी काणेकर यांनी संस्थेची पुढील ध्येयधोरणे व संकल्पना व संकल्प समोर मांडली.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉक्टर बी. एस.महाडेश्वर यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करून शिक्षणाचे महत्त्व मांडले. कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे यांनी संस्थेच्या १४ वर्षांच्या सांस्कृतिक कार्याचे आपण साक्षीदार असून संस्थेच्या सामाजिक भानाचे कौतुक केले.
कोकण रेल्वे पोलीस अधिकारी राजेश सुरवाडे यांनी आपले विचार मांडून संस्थेस शुभेच्छा दिल्या. अभिनेते विजय चव्हाण यांनी संस्थेशी आपले कौटुंबिक संबंध असून पुरस्कार कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो असे उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरचे साहित्यिक बाबुराव शिरसाठ यांनी महेश काणेकर यांच्या या ट्रस्टच्या कार्याचा मी साक्षीदार असून एखाद्या संस्थेच्या सातत्याने होणाऱ्या विविध अंगी पुरस्कार कल्पनेचे कौतुक केले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कै.सौ. उमा काणेकर यांचे वडील श्री जयसिंगराव बिल्ले हे कोल्हापूरहून आवर्जून उपस्थित होते. ट्रस्टमार्फत त्यांचाही हार्दिक सत्कार करण्यात आला. यावर्षी विशेष म्हणजे गुरुजनांचे सत्कार करण्याचे ठरवले होते.त्या दृष्टीने यंदा विशेष सन्मानित म्हणून प्रभाकर नेरुरकर गुरुजी श्री व सौ शैला शंकर कुंटे आणि संगीत साधक श्री बाळ नाडकर्णी यांचा गवाणकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाळ नाडकर्णी यांनी आपले विचार मांडले त्यापूर्वी संस्थेच्या पुरस्कार विशेष अंकाचे सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच बाबुराव शिरसाट लिखित शाहू महाराज यांच्या कौतुक गीताचे ही प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर यावर्षीचे जे विशेष सहा पुरस्कार जाहीर झाले होते.
त्यामध्ये वृंदा कांबळी साहित्य सेवा पुरस्कार सुहास वरूणकर नाट्य सेवा पुरस्कार,सौ सुप्रिया प्रभुमिराशी लोकसंगीत सेवा पुरस्कार, अक्षय मेस्त्री पशुपक्षी जीवनदान पुरस्कार, नितीन पाटील अर्थव्यवस्थापन पुरस्कार,श्रीकांत वणकुद्रे संगीत रत्न पुरस्कार यांना गंगाराम गवाणकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचे काही सौ. उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार अनुक्रमे श्रीमती सरिता पवार उपक्रमशील शिक्षिका, श्रीमती प्रणिता बांबुळकर प्रयोगशील शिक्षिका यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
त्याचवेळी शिक्षकांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रमुख तीन विजेते अनुक्रमे सतीश सिताराम कदम प्रथम क्रमांक, संजीव आत्माराम राऊत द्वितीय क्रमांक,श्रीमती नीता नितीन सावंत तृतीय क्रमांक यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेने आयोजित केलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन कवयित्री कल्पना मलये यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यास कणकवलीतील शिक्षक विद्यार्थी प्राध्यापक आणि प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते