निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेचा आचरा येथे मेळावा : भाजप नेते निलेश राणे यांच्यासह मान्यवरांनी सामाजिक संकल्पनेतील मेळावा आयोजनाचे कौतुक
आचरा, दि.११ मार्च (अर्जुन बापर्डेकर)
संघटीत होऊन तळागाळातील समाजाचा विचार करत आपण संघटनेच्या माध्यमातून फार मोठे पाऊल उचलले आहे. यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आवश्यक ती मदत ती करण्यासाठी हा तुमचा भाऊ कायम पाठीशी राहील. अशी ग्वाही भाजप नेते निलेश राणे यांनी आचरा येथे दिली.
निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेच्या आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निलेश राणे बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरान फर्नांडीस, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, माजी सभापती निलिमा सावंत, निर्भय महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आकांशा कांदळगावकर, उपाध्यक्ष मनिषा जाधव, उपाध्यक्ष प्रतिक्षा सारंग, सचिव अपर्णा गोलतकर यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
आपण संघटीत असल्यास शासन प्रशासन माध्यमातून अधिकाधिक विकासात्मक गोष्टी साध्य करु शकतात. संघटित होऊन सर्वासामान्य सहकारी महिला भगिनी यांच्या उन्नतीसाठी आपण उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
संघटनेच्या माणूसकीची भिंत या मदत केंद्राचे उद्घाटन निलेश राणे यांनी करून रोख स्वरूपात आर्थिक मदतही केली.दिवसभर रंगलेल्या या मेळाव्यात मत्स्य योजनांबाबत सहाय्यक अधिकारी तेजस्विनी करंगुटकर, बचत गट योजनांची माहिती रविकिरण कांबळी, यांनी दिली. यावेळी होममिनिस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मेळावा आयोजनाचे निलेश राणे यांच्यासह सर्वच मान्यवरानी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
निलेश राणे आले आमचे बळ अधिक वाढले : आकांक्षा कांदळगांवकर
गेल्या काही वर्षात सातत्याने सर्वसामान्य जनतेसाठी आपण काम करत आहात. त्यांना न्याय देत आहात. आमच्या संघटनेच्या मेळाव्यातही आपण प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहावे ही आमची सर्वांची इच्छा होती. तुम्ही आलात आमचे बळ अधिक वाढले आहे. एक आदर्श महिला सामाजिक संघटना म्हणून यापुढे आम्ही कार्यरत राहू. असा विश्वास निर्भय महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आकांशा कांदळगावकर यांनी व्यक्त केला.