सावंतवाडी दि.११ मार्च
काजू बी आणि काजू बोंडे यांना दर मिळत नसल्याने दरवर्षी काजू बागायतदार आंदोलनाची भूमिका घेत आहेत मात्र आश्वासना पलीकडे त्यांना अधिक काही मिळत नसल्याने यंदा बागायतदार आक्रमक भूमिका घेत आहेत.काजू बी ला प्रतिकीलो २०० रूपये हमीभाव मिळावा म्हणून मागणी होत असताना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी १३५ रूपये प्रतिकीलो भाव सरकार देण्याचा विचार करेल असे दोडामार्ग येथील सभेत म्हणाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग ,कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू बागायतदार आहेत काजू बागायतदारांना दरवर्षी काजू बी अल्प दरात विकावी लागत आहे तसेच आयात निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकार काजू बागायतदार अन्याय करत असल्याने काजू बी चा दर दरवर्षी खालावत आहे, असे म्हटले जात आहे.गेल्या काही वर्षापासून काजू बागायतदार काजू बी चा दर वाढत नाही तर तो कमीच होत आहे म्हणून चिंतेत आहेत.काजू बि ला दीडशेच्या खालीच दर मिळत आहे. तो १०० ते १३० रुपयांच्या घरात काजू बिला गेला काही वर्षांपासून दर मिळत आहे.तो किमान दोनशे रुपयांचा हमीभाव मिळावा म्हणून काजू बागायतदार आंदोलन करू लागले आहेत.
सरकार काजू बोंडू पासून प्रक्रिया उद्योग करण्याचे विचार करत असल्याबाबत मंत्री महोदय घोषणा करत आहेत मात्र दरवर्षी काजू बोंडे प्रक्रियेची घोषणा पोकळच ठरली आहेत. मात्र गोवा राज्यात काजू बोंडा वर प्रक्रिया उद्योग असल्याने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील गोवा राज्याच्या सीमेलगत भागातील काजू बागायतीरांकडून बोंडे खरेदी केली जातात आणि त्यांच्यावर गोवा राज्यात काजू फेणी व अन्य मध्यार्क निर्मिती केली जाते. त्यामुळे किमान काजू बागायतरांना थोडासा दिलासा मिळतो.
सध्याच्या तळपत्या उन्हामध्ये काजू बागायतदारांना काजू बी आणि बोंडू गोळा करावा लागतो.या दरम्यान काही अपघातांनाही सामोरे जावे लागते. तळपत्या उन्हामध्ये या हंगामामध्ये शेतकरी हा बागायतीत असतो आणि त्यातून त्याला उत्पन्नच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. नैसर्गिक हवामान व पर्यावरणीय बदलावर मार्ग काढण्यासाठी शेतकरी बागायतदार सतत कार्यरत आहेत मात्र काजू बी ला भाव मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काजू बी ही कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी करावी अशी मागणी आहे. मात्र सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती नामधारीच आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सेस गोळा करण्यापलीकडे काहीच करत नसल्याची नाराजी पसरली आहे.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथील सभेमध्ये काजू बी ला प्रतिकीलो १३५ रुपये भाव सरकार देण्याच्या विचारात करत असल्याची घोषणा केली मात्र उद्या मंगळवारी सावंतवाडी येथे याबाबत चर्चेसाठी त्यांनी बागायतदार संघाच्या प्रतिनिधी ना बोलावले आहे. मात्र काजू बागायतदारांनी केसरकर यांनी हा दर निश्चित कशावरून केला आहे असे प्रतिप्रश्न उपस्थित करत आहेत.केसरकर यांनी भांडवलदार आणि काजू प्रक्रिया उद्योजक यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू नये तर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत असे सावंतवाडी दोडामार्ग तालुका बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्याला काजू बी आणि काजू बोंडा पासून आर्थिक फायदा झाला पाहिजे तरच तो टिकेल असेही विलास सावंत यांनी म्हटले आहे.
सध्या काजू पिकाचा हंगाम असतो त्यामुळे कवडीमोल भावाने काजू बी शेतकरी विक्री करत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने काजू बी ला प्रतिकीलो २०० रूपये हमीभाव देण्याचा निर्णय घेतला पाहिजे असे काजू बागायतदार संघाचे म्हणणे आहे.