लागती काजू कलमे जळून खाक : लाखोंचे नुकसान
सावंतवाडी,दि.११ मार्च
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये गावाच्या सीमेवर मळगांव रस्तावाडी येथील काजू बागायतीत सोमवारी मोठी आग लागली आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या या आगीत लागती काजू बागायतींसह इतर अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या चॉकलेट फॅक्टरी च्या मागील बाजूस काजू बागायतीत आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी माजी सभापती राजू परब यांना दिली. त्यांनी नगरपालिकेत संपर्क साधत अग्निशमन बंब पाचारण केला.या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने ही आग आटोक्यात न येता आजूबाजूला पसरत गेली. चार ते पाच किलोमीटर परिसरात पसरलेल्या आगीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्यामुळे या वणव्यात काजू आंबा बागायतीसह अन्य वृक्षही जळून खाक झाले.
मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. कुंभार्ली भागाच्या तलाठी भक्ती सावंत यांनीही उपस्थित राहत पाहणी केली.
अग्निशमन बंब व स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे तांडव सुरूच होते. मळगाव येथील दोन पूर्वज मंदिरापासून ते महामार्गापर्यंत ही आग येऊन धडकली होती.
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत विलास सहदेव राऊळ, अरुण राऊळ, सुरेश सहदेव राऊळ, सुहास शशिकांत राऊळ यांची कलमी काजू बागायती तर दिलीप राऊळ यांची गावठी व कलमी काजूंची बागायती जळून खाक झाली. तर अन्य चार ते पाच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तलाठी भक्ती सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मंगळवरी कृषी सहाय्यकांसोबत नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून त्यानंतरच निश्चित नुकसानीचा अंदाज येईल, अशी माहिती भक्ती सावंत यांनी दिली.