मालवण,दि.१४ जानेवारी
मालवण आजची युवा पिढी थ्रीजी, फोरजी आणि त्याच्या पलीकडे विचार करणारी आहे. या युवा पिढीसमोर क्रांती करणारे बाबासाहेब आपल्याला मांडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला युवा पिढीशी कनेक्ट व्हावे लागेल. कारण आपण फुले, शाहु, आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. हा वैचारिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिनेनाटय अभिनेते निलेश पवार यांनीमालवण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी मालवण येथे बोलताना केले.
फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच महिला विभाग मालवण यांच्यावतीने एसटी स्टॅन्ड येथील समाजमंदिर येथे क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या कायक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना निलेश पवार हे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय अनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, सभेच्या अध्यक्षा माधुरी जाधव, महिला अध्यक्षा नेहा तांबे, सचिव निकीता मालवणकर, दर्शना गुळवे, राखी मालवणकर, निशाली पेंडुरकर, विद्या जाधव, समीक्षा मालवणकर, करुणा मालवणकर, नयना मालवणकर, विशाखा कदम, स्मिता जाधव, स्वाती कदम आदि उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी निशाली पेंडुरकर, नौसेना दिनाच्या निमित्ताने वाहतुक सेवा दिल्याबद्दल किशोर मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना निलेश पवार म्हणाले, मानव मुक्तीचा जो लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात उभारला त्याला जगानेही मान्यता दिली आहे. जगभरात ज्ञानाचे प्रतिक म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. ही ओळख प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. कारण जगाने बाबासाहेबांची दखल घेतलेली आहे. ही जगाने घेतलेली दखल आजच्या युवा पिढीसमोर आपल्याला मांडायची आहे. तरच क्रांती करणारे बाबासाहेब त्यांना समजतील व ते चळवळीशी कनेक्ट होतील. सोशल मिडीयाच्या प्रभावात असलेल्या नवीन पिढीला फुले, शाहु, अ आंबेडकर हे आपल्याला नव्या पद्धतीने समजावुन सांगावे लागतील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दर्शना गुळवे यांनी केले तर आभार स्वाती मालवणकर यांनी मानले.