ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,सिंधुदुर्ग या संघटनेची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे मागणी
तळेरे,दि.११ मार्च
सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा होण्यास कारणीभुत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. आणि प्राचार्य व संबंधित ठेकेदारांवरती तातडीने गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज भेट घेऊन केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांकडून मारझोड करण्यात येते तसेच संडास बाथरूमच्या साफसफाईसाठी कर्मचारी नेमण्यात आले नसून ती साफसफाई विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जेवणासाठी वापरण्यात येणारे अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असते. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत देखील हेळसांड असून पुरेशी स्वच्छता ठेवली जात नाही. विद्यार्थ्याच्या वसतीगृहाच्या खिडक्या व दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे त्यामधून रात्रीच्या वेळी सरपटणारे प्राणी जाऊन विद्यार्थ्यांना दंश करण्याचा संभव आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये पंखे व विद्युत वाहक उपकरणे खराब झालेली आहेत.अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पालकांनी व विद्यार्थ्यांनी संघटनेकडे केलेल्या आहेत. विद्यालयाच्या प्राचार्यांनी या सर्व गोष्टीची वेळीच गंभीर दखल घेतली नसल्याने ही घटना घडली आहे. यापूर्वी संघटनेच्या वतीने प्राचार्याची प्रत्यक्ष भेट घेऊन या गोष्टींकडे लक्ष वेधले होते. तरी देखील लक्ष देण्यात आले नव्हते.
या सर्व गोष्टींना प्राचार्याचा बेजबाबदारपणा सर्वस्वी जबाबदार आहे. तरी संबंधित प्राचार्यावरती पहिला गुन्हा दाखल करून त्याचे पहिले निलंबन करण्यात यावे तसेच जेवण व्यवस्था पाहणाऱ्या संबधित ठेकेदार आणि प्राचार्य या दोघांवरती गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही भूमिका ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज भेट घेऊन केली आहे.
याबाबतच्या सदर निवेदनाच्या लेखी प्रत पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी, तहसीलदार- सावंतवाडी, पोलीस निरीक्षक- सावंतवाडी यांना देखील प्रत देण्यात आली आहेत.
याबाबतचे निवेदन देतांना कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक जिल्हा सचिव अर्जुन परब, देवगड तालुका सदस्य राज खडपे, जिल्हा महिला संघटक सौ.शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका सचिव ॲड.संदीप चांदेकर, सदस्य सौ.मेघना साळगांवकर, कृष्णा गवस, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, सांगेली नवोदय विद्यालयाचे पि.टी.सी. सभासद लक्ष्मण कदम आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.