पंतप्रधान ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतर्गत ३१८ कोटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११० रस्त्यांची कामे प्रस्तावित ;१५ जानेवारी रोजी मंत्रालयीन स्तरावर बैठक

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

पंतप्रधान ग्रामसडक योजना(पीएमजीएसवाय) व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (सीएमजीएसवाय) या दोन योजनांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 110 रस्त्यांची कामे प्रस्तावित असून यासाठी 318 कोटी रु. निधी मंजूर आहे. यातील प्रधानमंत्री ग्रामसडकमधील 10 कामे मार्गी लागली असून उर्वरित कामे काही तांत्रिक त्रूटी, चढया दराच्या निविदा यामुळे प्रलंबित आहेत. यातील काही कामांच्या पुन्हा निविदा काढण्यात येणार असून अनेकवेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही अशा कामांच्या निविदांमध्ये आवश्यक बदल करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू आहे. याबाबत सोमवार 15 जानेवारी रोजी मंत्रालयीन स्तरावर बैठक होणार असून या बैठकीत काही सकारात्मक निर्णय होतील अशी माहिती प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयाचे उपअभियंता आर. पी. सुतार यांनी दिली.

जिल्हयातील ग्रामसडक योजनांतर्गत कामांची स्थिती व मंजूर निधी याबाबत माहिती घेण्यासाठी उपअभियंता श्री. सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हयात पीएमजीएसवाय व सीएमजीएसवाय अशा दोन सडक योजनांतर्गत एकूण 110 रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. या सर्व रस्त्यांचे तांत्रिक आराखडे पूर्ण झाले असून शासनाने यासाठी 318 कोटी रु. एवढा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 11 पॅकेज अंतर्गत 30 रस्त्यांची कामे मंजूर असून यासाठी 105 कोटी रु. निधी मंजूर आहे. यातील 4 पॅकेज अंतर्गत 10 रस्त्यांच्या कामांना योजनेच्या राज्यस्तरीय समितीकडे 2 जानेवारी 2024 रोजी अधिस्वीकृती देण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

ही कामे निवीदा स्वीकृतीबाबत पत्र प्राप्त होताच संबंधीत मक्तेदार यांना मंजुर निविदेनुसार करारनामे करण्यासाठी कळवले जाईल. करारनामे झाल्यानंतर वर्क ऑर्डर्स दिल्या जातील.या सर्व कामासाठी आगामी आठ ते दहा दिवसांत कार्यवाही चालू राहील. देवगड, कणकवली, सावंतवाडी व मालवण तालुक्यातील रस्ते कामांचा यात समावेश असून यासाठी 37 कोटी रु. मंजूर आहेत.