सावंतवाडी दि.१२ मार्च
आज २१ व्या शतकात आपण चंद्रावर पोहचलो, डिजिटल आणि टेक्नॉलॉजिच्या मोठं मोठया गप्पा मारतो. मोनो, मेट्रो, बुलेट ट्रेन च्या दुनियेत, सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कुणकेरी गावातील सरुंदेवाडी आजही रस्ता जोडणारा पूल नसल्या कारणाने दुर्लक्षित राहिली आहे. विकासाच्या मुख्य घटकापैकी दळणवळण च्या सुविधे पासून येथील ग्रामस्थ्य मात्र आजही वंचित असल्याने रोजच्या जगण्यासाठी आज त्यांना धडपडावे लागत आहे.
सरुंदेवाडी हा भाग पाळणेकोंड धरणक्षेत्राच्या खालच्या बाजूला येतो. त्याच ठिकाणी प्रसिध्द असे श्री देव उपरलकर देवस्थान आहे या ठिकाणी भाविक कायमच ये जा करीत असतात. पाळणेकोंड धरणाच्या सांडव्यातून पडणारे पाणी याच ओहळतून पुढे जाते. पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यावर गोडबोले गेट उघडल्यावर अचानक या ओहळला पूर येतो. ओहळाच्या पलीकडच्या माणिकचौक, भवानीवाडी, परबवाडी या वाडीतील ग्रामस्थ्यांची शेती व बागायती ही तिकडे असल्याने त्यांना कायम या ओहळातून ये जा करावी लागते. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न मिळता अचानक मोठया प्रमाणात पाणी आल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात या ओहळला कायम पाणी हे धोकादायक पातळीवर असल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला जातो. अश्यावेळी कोणाची तब्बेत जर खालवली तर त्याला वैद्यकीय सुविधा मिळणे खुप अवघड असते तसेच तिला उचलून पलीकडे आणावे लागते. सध्या या वाडीतील ६० टक्के ग्रामस्थ्यांचे वय हे ६५ वर्षाच्या पलीकडे असल्याने त्यांना कायम डॉक्टर व औषधोपचारावर अवलंबून राहावं लागते. अश्यावेळी पावसाळ्यात त्यांना अत्यावश्यक सुविधा मिळू शकत नसल्याने जीवन हे रामभरोसे झालेले आहे.
खुप अडचणींचा सामना करत येथील ग्रामस्थ खडतर जीवन जगत आहेत.
आज मागील २० वर्षे पासून या पुलासंदर्भात वेगवेगळ्या पक्षाच्या पुढऱ्यांना निवेदन दिली गेली तसेच बऱ्याच पुढऱ्यांनी आश्वासाने दिली पण आजही प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जैसे थे आहे. विद्यमान आमदार तसेच शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दीपक केसरकर यांच्या कडे वारंवार याचा पाठपुरावा केला गेला पण आज २० वर्षे झाली फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले गेले.
आज हे पूल व्हावे अशी सर्व कुणकेरी वासिय ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकारी याची मनापासून इच्छा आहे. परंतु आजही शासन दरबारी याची नोंद घेतली घेतली जात नाही.
पुढे लोकसभे ची निवडणूक आली आहे तत्पूर्वी जर पुलाचा प्रश्न निकाली न काढल्यास ग्रामस्थानकडून भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे तसेच सर्वच राजकीय पुढऱ्यांना ग्रामस्थ प्रचार बंदी करतील. असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज घाटकर व पिडीत ग्रामस्थ ह्यांनी व्यक्त केले आहे.


