सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला येणार नवी झळाळी

जिल्हाधिकारी कार्यालय दुरुस्तीसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण , ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून २३ कोटी ७८ लाख मंजुर ; कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली दि. १२ मार्च ( भगवान लोके )
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (प्रशासकीय इमारतींचे) च्या दुरुस्तीबाबतचे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये गेल्या ३ वर्षातील झालेली कामे वगळून नवीन दुरुस्तीसाठी २३ कोटी ७८ लाख १७ हजार रुपये निधी मंजुर केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण , केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजुर झाला आहे. कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती १९८१ साली झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या इमारतीची किरकोळ दुरुस्ती वगळता एवढ्या मोठया प्रमाणात दुरुस्ती साठी निधी प्राप्त झाला नव्हता. मात्र कार्यकारी अभियंका अजयकुमार सर्वगोड यानी इमारतींची अवस्था पाहिल्यानंतर दुरावस्था झालेल्या इमारतींबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर घातले. तातडीने प्रशासकीय इमारती दुरुस्ती बाबत सुचना ना. रविंद्र चव्हाण यांनी श्री. सर्वगोड यांना केल्या होत्या. श्री. सर्वगोड यांनी तातडीने प्रस्ताव करत मुंबई येथील मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुरुस्तीबाबत पत्र प्राप्त झाले आहे. सर्व बाथरुम,इमारतीची दुरुस्ती,अन्य कामे लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.