नरेंद्र डोंगरावर जाण्यासाठी दोन वाहनांची सोय तसेच पर्यटक निवास व्यवस्था करण्यात आली, याचा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक निश्चितच लाभ घेतील -मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी दि.१२ मार्च
सावंतवाडी नरेंद्र डोंगर येथे निसर्ग पर्यटन, दुर्मिळ प्राणी आणि जैवविविधता माहिती केंद्र उभारण्यात आले असून खास नरेंद्र डोंगरावर जाण्यासाठी दोन वाहनांची सोय तसेच पर्यटक निवास व्यवस्था करण्यात आली आहे,याचा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक निश्चितच लाभ घेतील असा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सह्याद्री पट्ट्यातील डोंगर कपारीतील समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यामुळे या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी आमचे प्रयत्न असून वनपर्यटनासाठी सकारात्मक असलेले नवलकिशोर रेड्डी यांच्या रूपात पहिलेच उपवनसंरक्षक जिल्ह्याला लाभले आहेत. नापणे, सावडाव येथील धबधब्यांच्या विकासासाठी पैसे देण्यात आले आहेत. आंबोलीतही एकाच धबधब्यावर मोठी गर्दी होते यासाठी उर्वरित धबधब्यांच्या विकासासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महिलांसाठी वेगळा धबधबा विकसित करण्याचा आमचा मानस आहे.
या उर्वरित प्रकल्पांसाठीही लवकरच निधी देण्यात येईल. सावंतवाडीच्या नरेंद्र उद्यानाचाही कायापालट करण्यात आला आहे. अशा प्रकल्पांमधून पर्यटन वाढीसाठी निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमात नरेंद्र डोंगरावरील उद्यानामधील पर्यटकांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेले टेन्ट, जिल्ह्यातील सर्व जैवविविधतेची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेले निसर्ग माहिती केंद्र तसेच नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडी शहर पाहण्यासाठी उभारण्यात आलेला मनोरा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, ओपन जिम स्वच्छतागृहे व जंगल सफारीसाठी उपलब्ध करण्यात आलेली वाहने यांचे ऑनलाइन लोकार्पण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी स्थानिक लोकांसाठी वनाधारित उद्योगांबाबत माहिती दिली. आईन वृक्षापासून टसर रेशीम सिल्क निर्मिती प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात असून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे येथे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प आता इतर जिल्हाभरातही राबविण्यात येणार आहे. यासाठी १०० लाभार्थी निवडण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रकल्प पोहोचविण्यासाठी आमचा मानस असल्याची माहिती उपवनसंरक्षक नवल किशोर रेड्डी यांनी दिली.
यावेळी एव्हीच्या माध्यमातून नरेंद्र उद्यानात साकारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती देण्यात आली. सावंतवाडी तालुक्याचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी याबाबतची विस्तृत माहिती दिली. सावंतवाडी शहरालगतच्या नरेंद्र डोंगरात विकसित करण्यात आलेल्या या नरेंद्र उद्यानातील पर्यटन सुविधांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांना सुविधा देण्याबरोबरच नागरिक व लहान मुलांना मनोरंजनाची साधने ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यानी सांगितले.