गोळवण मधील शेतकऱ्यांचे उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर स्थगित

मालवण, दि.१२ मार्च

मालवण तहसील कार्यालयाबाहेर महेश विठोबा जुवाटकर आणि गोळवण येथील शेतकरी रामा घाडीगावकर, गंगाराम घाडीगावकर, बाळकृष्ण घाडीगावकर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी उपोषण छेडले. दरम्यान, याप्रकरणी संबंधित जागेची स्थळ, पाहणी करून नुकसानग्रस्ताला भरपाई मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.

गेली ५० वर्षे गोळवण येथील शेतकरी गंगाराम सोनू घाडीगावकर व त्यांचे भाऊ पावसाळी व उन्हाळी (वर्षातून दोनवेळा) भात, कुळीथ, उडीद, भुईमुग, चवळी, पालेभाज्या असे पीक घेतात व वार्षिक उपजीविकेसाठी अन्नधान्याची साठवण करून ठेवतात. मात्र अलिकडे त्यांच्या लगत असलेल्या जमिनीची चुकीच्या माध्यमातून (कुळकायदा जमिनीची) विक्री करण्यात आली. यातच जूनच्या पहिल्या आठवड्यात संततधार पाऊस झाला. त्यामुळे डोंगरावरील माती गंगाराम सोनू घाडीगावकर यांच्या कुणग्यांमध्ये वाहून आली. यामुळे त्यांची शेतजमीन नापीक झाली. याचा परिणाम २०२३-२०२४ या दरम्यान त्यांना कोणतीही शेती करता आली नाही. गोळवण तलाठी व कृषीसेवक यांचा या नुकसानीसंदर्भात ६ जुलै २०२३ चा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

नुकसान झालेले शेतकरी मालवण तहसील कार्यालयाकडे वेळोवेळी ये- जा करताहेत. तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही. यासाठी आपण उपोषण छेडले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.