उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयावर श्रमिक मुक्ती दल १८ मार्च रोजी मोर्चा काढणार

सावंतवाडी दि.१३ मार्च 
भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम सहाप्रमाणे काढलेला जाहीरनामा तात्काळ मागे घेऊन या जाहीरनाम्यात उल्लेख केलेल्या माणगाव खोऱ्यातील केरवडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना कायम मालकी हक्काने मिळाव्यात यासाठी उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयावर श्रमिक मुक्ती दल सोमवार दि १८ मार्च रोजी मोर्चा काढणार आहे.

श्रमिक मुक्तिदल आणि सत्यशोधक जन आंदोलन प्रणित केरवडे पंचक्रोशी वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने सोमा परब, हरिचंद्र सावंत, लक्ष्मण तावडे, मोहन निकम आदींनी उपवनसंरक्षक यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे.

या जाहीरनाम्याने वन जमाबंदी अधिकारी, कोकण भवन यांच्या कार्यालयाकडून आम्ही पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी राखीव वने म्हणून प्रस्तावित करण्याचे ठरविले आहे. खरं तर सदरच्या जमिनी ह्या पूर्वापार आकारीपड म्हणजेच महसूल विभागच्या जमिनी होत्या. त्या जमिनी आमच्या अनेक पिढ्या कसून त्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलो आहोत. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) अधिनियम १९७१ नुसार राज्यशासनाने (महसूल विभागाने) जाहीरनामा प्रसिध्द करून कुळांचे हक्क कायम करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने या जमिनी वनविभागाकडे वर्ग झाल्या. असे असले तरी या जमिनी आजअखेर आमच्या वहिवाटीखाली आहेत असे या निवेदनात म्हटले आहे.

अलीकडेच देशभरातील आदिवासी आणि इतर वननिवासी लोकांनी एकत्र येत केलेल्या संघर्षामुळे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ नुसार ऑक्टोंबर २००५ पर्यंत ज्या वन जमिनीवर, वनावर, त्यातील वनउपजावर स्थानिकांचे जे अधिकार आहेत ते कायम करण्याचे अधिकार मिळाले आहेत. असे असतांना कोकण विभागचे वन जमाबंदी अधिकारी यांनी हा जाहीरनामा काढून आमच्या अधिकारांचे हनन केले आहे. खरतरं भारतीय राज्यघटनेने जीवितेचा अधिकार हा मुलभूत अधिकार मानला आहे. त्यामुळे या जाहीरनाम्याने आमच्या जीवितेचा अधिकार या मुलभूत अधिकारावरच गदा येणार आहे. त्यामुळे हा जाहीरनामा तात्काळ मागे घेऊन आम्ही पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी कायम मालकी हक्काने मिळाव्यात यासाठी उपवनसंरक्षक कार्यालयावर सोमवार दि १८ मार्च रोजी केरवडे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी स्त्री-पुरुष श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई आणि सत्यशोधक जनआंदोलनाचे अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेवून येणार आहोत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.