शिलाहार राजा भोज दुसरा याचा सातर्डे येथील (दानलेख) हळेकन्नड शिलालेख

वीरगळ सतिशिळा व शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने

सावंतवाडी,दि.१३ मार्च
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डे येथील महादेव मंदिराच्या गाभाऱ्याच्या डावीकडील देवकोष्टात असलेला शिलालेखाचे वाचन पुणे येथील वीरगळ सतिशिळा व शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी वाचन केला. यामुळे मोठा ऐतिहासिक ठेवा पुढे येणार असून त्या गावालाही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल.

याबाबत माहिती देताना अनिल दुधाने म्हणाले की, हा शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून जुन्या हाळे कन्नड भाषेतील आहे. शिलालेखात एकूण २८ ओळी असून सध्या २० ओळीचे वाचन पूर्ण झाले आहे. राहिलेल्या ८ ओळीची अक्षरे लहान असून व्यवस्थित लागत नाहीत. शिलालेखाची लाबी ५६ सेमी X ३६ सेमी अशी आहे. या लेखाची शिळा गुळगुळीत असून सुस्थितीत आहे. त्यावरील कोरलेला मजकूर एकसारखा, सुवाच्य सहजपणे वाचता येईल असा आहे. ८०० वर्षानंतरही त्यावरती वातावरणाचा फारसा परिणाम झालेला नसून आजही त्याचा कोरीवपणा कायम आहे.

शिलालेखाच्या वरील भागात सूर्य चंद्र कोरलेले असून त्याचा अर्थ “यावत चंद्रो दिवाकरो विलसतस्तावस्तमृज्जभंते” म्हणजे जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत या लेखाची कीर्ती राहील. त्याच्या बाजूला एक तलवार कोरली आहे ते एका विशिष्ठ राजसत्तेच्या प्रतीक असते. गाय वासरू त्याच्या खाली कोरले आहे. ती धेनुगळ आहे. ते दानाचे प्रतीक असून गाय म्हणजे राजा आणि वासरू म्हणजे प्रजा ज्या प्रमाणे राजा आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करतो. शेजारी नंदी शिवाचे वाहन असून समोर शिवलिंग आहे शेजारी पुरोहित हातात पूजेचा दीप घेवून शिवाची पूजा करत आहे दुसऱ्या हातात भस्म किंवा परचूंडी असावी .शेजारी कार्याची सुरवात करणारा उकडवू मुद्रेतील श्री गणेश मूर्ती आहे .त्याच्या हातात परशू व अंकुश आयुधे आहेत.

शिलालेखाचा अर्थ (चौकट)

हा शिलालेख कन्नड भाषेतील असून तेराव्या शतकातील महामंडलेश्वर शिलाहार राजा विजयादित्य याचा मुलगा भोजदेव (द्वितीय) हा कोल्हापूर जवळील किल्ले पन्हाळा दुर्ग येथील आपल्या छावणीतून राज्य करत होता. त्याच्याच कारकिर्दीत, शालिवाहन शके ११२८ व्या वर्षी (चक्रीय वर्ष) क्षय नाम सवत्सरतील भाद्रपद महिन्यातील वद्य ३ ला म्हणजेच सोमवारी ०७ ऑगस्ट १२०६ दिवशी, सर्वांच्या उपस्थितीत. , यकलखंडीचे (आताची कालाखंडी वाडी)गावचे महाजन [आणि त्या ठिकाणचे इतर विषय]

प्रभू बाप्पदेवाच्या पुत्राने विठ्ठल देवाने सकलेश्वर महादेव मंदिराच्या पूजा आणि उत्सवसाठी शाश्वत देणगी म्हणून १५ गडिया (सोन्याची नाणी) दान दिली. . या दानाचे उल्लंघन करणार्‍याला कुरुक्षेत्र, गया आणि वाराणसी आणि त्या ठिकाणच्या ब्राह्मणांचा नाश करण्याचे ब्रह्महत्येचे पाप लागेल असे शापवाचन त्यात नमूद केले आहे. पुढे देवाच्या प्रसादासाठी ३६ बेले (सर्वात कमी सोन्याचे नाणे मूल्य, १ गड्याना = ८० बेले) व्याजाने जमा केले जाते, ज्यातून ओल्या जमिनीच्या उत्पादनाचे ९ खंडुग (खंड माप) (भात) द्यावे. दीपावलीच्या प्रत्येक ५ व्या दिवशी स्थानपती (मंदिराचे निवासी मुख्य पुजारी) यांच्याकडे; १० बेल्यासाठी ५ बेलांची कायमस्वरूपी देणगी द्यावी (कोणत्या व्याजातून?) दीपावलीच्या प्रत्येक ५व्या दिवशी एक गाय खरेदी करून द्यावी लागेल; २० बेले देणगीतून जमा होणाऱ्या ५ बेलेच्या व्याजातून, २ बेले दरवर्षी स्थानपतींना, २ बेळे तुर्याला (तुतारी वाजवणाऱ्यांना) आणि एक बेळे (धर्मानीला धर्माचे काम करणारा ) द्याव्यात; पहिल्या एक बेळे व्याजापासून, एक सुपारी आणि दोन सुपारीची पाने दररोज द्यावीत. या दात्याने देवाला दिलेले अनुदान महाजन, स्थानपती आणि दात्याच्या गोत्रातील वंशजांनी सतत चालू ठेवावे आणि प्रभूची (दात्याची) प्रार्थना [मंदिरात] सतत ऐकली जावी असे म्हटले आहे.

अजून काही ओळी अगदी लहानात लिहिल्या आहेत.

ज्या अक्षरांमध्ये शिलालेखाचे उपकारात्मक आणि अयोग्य भाग असू शकतात. मात्र, शेवटच्या पण एका ओळीत ‘ओम नमः शिवाय’ असा उल्लेख आहे.

खालील ठिकाणांचा उल्लेख आहे: पनालेदुर्ग = पन्हाळेदुर्ग; सतारवाडी(?) = सातार्डे; यकलखंडी = कालखंडी

 

शिलाहारांची नाणी –गड्यान

गद्यान..हे एक शिलाहार राजवटीचे एक चलनी नाणे (परिमाण) आहे. गड्यान म्हणजे हत्ती ..हत्तीचे अंकन असलेले परिमाण होय . हे चलन पूर्वी चालुक्य राजवटीत ही वापरले आहे . मध्यप्रदेश येथेही ही नाणी माळवा प्रांतात मिळाली आहेत. त्याच्या पुढील राजवटीत त्याची नावे ,पॅगोडा, होन अशी बदलत गेलेली दिसतात. शिलाहार राजा भोज पहिला याच्या कारकीर्दीत वापरलं गेलेले गद्यान हे नाणे सोन्याचे असून त्याचे वजन ३.९५ ग्राम इतके होते .हे नाणे ई. सन ११०० ते १२०० दरम्यान वापरले गेले. त्याच्या एका बाजूवर डाव्या हातात साप धरून डावीकडे डोके वळवून मानव वंशीय गरुड नृत्य करत आहे. तर दुसऱ्या बाजूवर दोन मजली विमान आधारस्तंभ आणि गर्भगृहात विराजमान असलेले शिवलिंग असते. शिलाहार राजा भोज दुसरा याच्य कारकीर्दीत वापरले गेलेले गद्यान हे नाणे चांदीचे असून त्याचे वजन ४.२६ ग्राम इतके होते. हे नाणे ई.सन ११७५ ते १२१२ पर्यंत वापरले गेले त्याच्या एका बाजूला एक घोड्यावर बसलेला वीर योद्धा असून त्याच्या हातात भाला व तलवार आहे. घोड्याच्या पायाशी वीर सैनिक मरण पावले आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्याचा प्रमुख दाखवला आहे .

शिलाहार राजे :-

११. व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावाच्या मृत्यूनंतर, इतिहासाच्या पुस्तकांवरून असे दिसून येते की विक्रमादित्य सहाव्याचे नंतरचे उत्तराधिकारी त्यांच्यासारखे महान कर्तृत्ववान नव्हते. त्यामुळे कल्याण चालुक्यांच्या सरंजामदारांनी मध्यवर्ती राज्यकर्त्यांविरुद्ध उठाव सुरू केला.या क्रांतीमध्ये, बिज्जल द्वितीय नावाच्या कलचुरी वंशाच्या सामंताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने आपला मामा भाऊ चालुक्य तैलपा तिसरा याला पदच्युत केले आणि कल्याणच्या गादीवर बसला. त्यांनी स्वत:ला चक्रवर्ती (सम्राट) म्हणूनही घोषित केले. या राजकीय संक्रमणादरम्यान, पूर्वी सरंजामशाही असलेल्या अनेक छोट्या राज्यांनी स्वत:ला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्याचा इरादा विकसित केला.

१२व्या शतकाच्या उत्तरार्धात, बिजल्ला दुसरा आणि वीरशैवांमधील संघर्षांमुळे चक्रवर्ती बिजल्ला दुसऱ्याची ची हत्या झाली. या मोठ्या घटनेनंतर, कालाचुरींची मध्यवर्ती पकड कमकुवत झाली आणि यामुळे अनेक लहान राजवंशांना स्वातंत्र्य मिळाले असावे. कोल्हापूरचे शिलाहार हे त्यापैकीच एक असावेत. बिज्जलाच्या हत्येच्या वेळी शिलाहारांचा प्रमुख विजयादित्य होता. शिलाहारांचा पराक्रमी आणि स्वतंत्र राजा भोज दुसरा हा विजयादित्य आणि श्रीरत्न यांचा पुत्र होता.भोज दुसरा चे पूर्वी प्रकाशित असलेले शिलालेख मध्ये शक ११०४. चा कोल्हापूर शिलालेख ,शक १११२-१११५ चा कोल्हापूर शिलालेख ,शक १११३ चा कशेळी ताम्रपट, शक १११३ चा कुतापूर ताम्रपट प्रसिद्ध आहेत

शिलालेखाचे महत्व :-

सातार्डे शिलालेख हा इसवी सन १२०० च्या उत्तरार्धात दक्षिण कोकणावर भोज दुसरा राज्य करत होता याचा निश्चित पुरावा आहे. राजा भोज दुसरा याने देखील आपल्या पुर्वाजाप्रमाणे अनेक बिरुदे धारण केलेल्या दिसतात .पण स्वताच्या कारकिर्दीत त्याने उ परनारी सहोदर ,शरणागतवज्रपंजर ,कलियुगयुधीष्ठार या नवीन बिरुदे त्याने स्वतः निर्माण केलेली आहेत ,त्याचे कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ल्या वरून राज्य करून दक्षिण कोकण पर्यत त्याचे राज्य होते .स्वताच्या राज्याची व्यवस्था म्हणून त्याने कोकणातील मंदिरांना सोन्याची नाणी दान स्वरुपात देवून तेथील व्यवस्था सुरळीत चालवली आहे असे दिसते यावरून तो आपल्या पुर्वाजाप्रमाणेच धार्मिक ,दानी सामाजिक ,न्यायाची भूमिका असणारा ,परस्त्रीला मातेसमान मानणारा राजा होता . हे या शिलालेखाचे विशेष महत्व आहे . दक्षिण कोकणातील मंदिरे, स्मारके आणि शिलालेखांचे निरीक्षण केल्यावर असे म्हणता येईल की, प्राचीन कोकणचा सर्वसमावेशक इतिहास समजून घेण्यासाठी आणखी शोध घेण्याची गरज आहे.

यासाठी सातार्डे येथील ग्रामस्थ पंकज मेस्त्री ,सागर मेस्त्री ,शिलाहार कालीन नाणी याकरिता किरण शेलार आशुतोष पाटील , तसेच कोल्हापूर येथील युवा संशोधक चैतन्य अष्टेकर ,आशिष कुलकर्णी, यांची मोलाची मदत व सहकार्य झाले.