वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक साहाय्य देण्यास विलंब ; मेघनाद धुरी यांचा उपोषणाचा इशारा

मालवण,दि.१४ जानेवारी

क्यार व महा चक्रीवादळमुळे मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मच्छिमारी करता आलेली नाही. वादळानंतर राज्य शासनाने मच्छिमारांना मंजूर केलेले विशेष आर्थिक साहाय्य तीन वर्षे झाली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून लाभार्थी मच्छिमारांना वाटप करण्यात आलेले नाही. मदतीची ही रक्कम देण्यास दिरंगाई होत असल्याने मत्स्य विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात मालवण येथील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर १७ जानेवारी रोजी उपोषणास बसू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

राज्यातील सागरी मच्छिमारांना क्यार व महा चक्रीवादळांमूळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नसल्याने राज्यसरकारने विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केले होते. त्यामध्ये बिगर यांत्रिक नौकांपैकी ३२ नौकांचे २०,०००/- रु. प्रमाणे ६,४०,०००/- रुपये, एक/दोन सिलिंडर नौकांपैकी २२ नौकाचे २०,०००/- रु. प्रमाणे ४,४०,०००/- रुपये, तिन/चार सिलिडर नौकांपैकी ३५ नौकांना ३०,०००: रु. प्रमाणे १०,५०,०००/- रुपये व मासळी विक्रेता ६५० जणांचे ६,०००/- रु. (दोन शितपेटया) म्हणजेच सुमारे ३९,००,०००/- रुपये असे एकूण सुमारे ६३,६०,०००/- रु. चे वितरण तीन वर्षे होऊनही केलेले नाही. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग- मालवण यांचे खात्यावर क्यार व महा चक्रिवादळांपैकी सुमारे ७२ लाख रुपये शिल्लक असून अद्याप यांचे वाटप केलेले नाही. हा मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांवर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे, असे मेघनाद धुरी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मनमानी कारभाराविरोधात व लाभार्थ्यांना मंजूर असलेली रक्कम देण्यास दिरंगाई होत असल्यामुळे दि. १७ जानेवारी रोजी मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर आपण उपोषणास बसणार आहोत, असे मेघनाद धुरी यांनी म्हटले आहे.