वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

बांदा दि.१३ मार्च
सातोसे अत्रेवाडी येथील शेतकरी रघुनाथ श्रीधर पेडणेकर यांच्या घरालगतच्या गोठ्यात घुसून बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला. यात हल्ल्यात वासरू जखमी झाले. अन्य गायी जोरजोरात हंबरू लागल्याने रघुनाथ पेडणेकर यांना जाग आली व त्यांनी बिबट्याला हूसकावून लावले. बिबट्याच्या थेट भरवस्ती पर्यंतच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्यांचे गाईचे वासरू जबर जखमी झाले आहे. खाजगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वासरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या काजू हंगाम सुरू असून बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सातोसे अत्रेवाडी भागात बिबट्याची दहशत गेली अनेक वर्षे सुरूच आहे. यापूर्वीही बिबट्याने भरवस्तीत हल्ले करून पाच – सहा पाळीव कुत्र्यांचा बळी घेतला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ वारंवार करीत आहेत. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.