वेंगुर्ला,दि.१३ मार्च
नगर वाचनालयाने सुरू केलेला ई लायब्ररी विभाग हा एमपीएससी, यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन मोठे अधिकारी बनावे असे उद्गार मायक्रोटेक कॉम्प्युटरचे संचालक मार्तंड सावंत यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.
जिल्हा वार्षिक यजना सन २०२२-२०२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनांमध्धून नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेस ‘ई लायब्ररी‘ विभाग बनविण्यासाठी अडीच लाख किमतीचे साहित्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झाले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाची पुस्तके, ५ संगणक संच, त्यासाठी बॅट-या, युपीएस, टेबल, खुर्च्या यांचा समावेश आहे. स्व.वसंतराव डावखरे यांच्या नावाने असलेल्या या स्पर्धा परीक्षा केंद्राचे म्हणजेच ई लायब्ररीचे उद्घाटन १० मार्च रोजी मार्तंड सावंत यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आपल्या विकासासाठी करायला हवा. तसेच त्यांनी आपले ध्येय निश्चित करून सरकारी अधिकारी बनावे अशी अपेक्षा संस्था अध्यक्ष अॅड.सूर्यकांत खानोलकर यांनी व्यक्त केली. वेंगुर्ला नगरवाचनालयातील पुस्तकांचा अभ्यास करून आजपर्यंत बरेचजण न्यायालय लिपीक, शिपाई, पोलिस विभाग, भूमि अभिलेख, कृषी विभाग, तलाठी, पंचायत समिती, खारलॅण्ड आदी ठिकाणी नोकरीला लागले असल्याची माहिती कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी दिली. कार्यवाह कैवल्य पवार यांनी ई लायब्ररीबाबत माहिती दिली. यावेळी कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, कार्यकारी मंडळ सदस्य राजेश शिरसाट, अॅड.नंदन वेंगुर्लेकर, मेहंदी बोवलेकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.